देशभर ‘जीएसटी बचत महोत्सव’ दणक्यात सुरू

सणासुदीत खरेदीची ‘बंपर’ लॉटरी! कंपन्यांकडून किमतीत मोठी घट

* उद्योगजगतात उत्साहाचे वातावरण

नवी दिल्ली/22 सप्टेंबर : येत्या सणासुदीच्या हंगामात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि मंदावलेल्या मागणीला चालना देण्यासाठी भारतीय उद्योगजगताने कंबर कसली आहे. वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती कमी केल्या. जीएसटी सुधारणा देशभर सोमवारपासून लागू झाल्या, ज्याला व्यापारी जगताने मोठ्या उत्साहात सकारात्मक प्रतिसाद दिला. काही कंपन्यांनी तर जीएसटी कपातीपेक्षाही जास्त सवलत दिली असून, त्यामुळे सणासुदीच्या काळात बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड उडेल आणि अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना थेट पत्र लिहून ‘नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणां’मुळे सामान्य नागरिकांची वार्षिक सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांची बचत होईल, असा विेशास व्यक्त केला आहे. जीएसटी परिषदेने 3 सप्टेंबर रोजी विविध वस्तूंवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतल्यापासून कंपन्यांनी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. सरकारच्या निर्देशांनुसार, वितरकांना नवीन किमती कळवण्यात आल्या आहेत, कंपन्यांच्या वेबसाईटवर जुन्या आणि नवीन किमतींची सविस्तर यादी प्रसिद्ध केली जात आहे आणि कारखान्यांमध्ये नवीन एमआरपी असलेल्या पॅकिंगचे उत्पादन वेगाने सुरू आहे. आईस्क्रीम पार्लर, किराणा दुकाने, पादत्राणांची शोरुम्स, तसेच गृहोपयोगी वस्तू आणि वाहन कंपन्यांनी आपल्या उत्पादनांना नवीन किमतीचे टॅग लावले आहेत. या निर्णयामुळे उद्योगजगतात उत्साहाचे वातावरण आहे. ‘शॉपर्स स्टॉप’चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक कविंद्र मिश्रा म्हणाले की, ज्या ब्रँडस्वरील जीएसटी कमी झाला आहे, त्यांनी आमच्या स्टोअर्समध्ये किमती आधीच कमी केल्या आहेत; आता दसरा आणि दिवाळीच्या विक्रीसाठी आम्ही सज्ज आहोत. ‘बस्किन रॉबिन्स’ चालवणाऱ्या ग्रॅव्हिस फूड्सचे सीईओ मोहित खट्टर यांच्या मते, ग्राहकांना सरासरी 10 ते 11 टक्के बचत अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात जीएसटी कपातीचे संकेत दिल्यानंतर काही काळासाठी वाहन आणि गृहोपयोगी वस्तूंच्या विक्रीत घट झाली होती, मात्र आता कंपन्यांना विश्वास आहे की सणासुदीच्या काळात ही घट भरून निघेल. यावर्षी उन्हाळा थंड गेल्याने विक्री कमी झाली होती; आता कर कपातीमुळे विक्रीला मोठी चालना मिळेल, असे ‘ब्ल्यू स्टार’चे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन म्हणाले. कंपन्यांना विक्री वाढण्याची खात्री असल्याने त्या जीएसटी कपातीपेक्षा जास्त सवलत देत आहेत, असे ‘रसना ग्रुप’चे अध्यक्ष पिरुझ खंबाटा यांनी नमूद केले. ‘गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस्’चे सीईओ सुधीर सीतापती यांच्या मते, ही मागणीला चालना देणारी अत्यंत आवश्यक बाब आहे; ग्राहक या बचतीचा उपयोग इतर वस्तूंच्या खरेदीसाठी करतील. एकंदरीत, सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांना सणासुदीच्या खरेदीत मोठा दिलासा मिळणार आहे, तर कंपन्यांना वाढीव विक्रीतून अर्थचक्राला गती देण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे येणारा सणासुदीचा हंगाम ग्राहक आणि उद्योगजगत दोघांसाठीही ‘बंपर’ ठरेल, अशी चिन्हे आहेत. प्रमुख कंपन्या आघाडीवर आहेत: पार्ले प्रॉडक्टस् कंपनीचे उपाध्यक्ष मयंक शाह यांनी सांगितले की, 7,000 हून अधिक वितरकांना नवीन किमती कळवण्यात आल्या असून सर्व उत्पादने नवीन एमआरपीसह बाजारात दाखल झाली आहेत. आयटीसी, सुमारे 70 लाख दुकानांपर्यंत पोहोचणारी कंपनी, देखील आपल्या विक्रेत्यांना नवीन किमतींबद्दल माहिती देत आहे; काही काळ बाजारात जुन्या आणि नवीन दोन्ही किमतींची उत्पादने उपलब्ध असू शकतात, असे कार्यकारी संचालक हेमंत मलिक यांनी स्पष्ट केले. लिबर्टी शूजचे कार्यकारी संचालक अनुपम बन्सल म्हणाले की, आम्ही 3,000 रुपयांपर्यंतच्या पादत्राणांच्या किमती 500 रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत, ज्यामुळे ग्राहक नॉनब्रँडेड वस्तूंऐवजी ब्रँडेड वस्तूंकडे वळतील, अशी अपेक्षा आहे. मदर डेअरी आणि रिलायन्स: अगदी 5 आणि 10 रुपयांच्या वस्तूंवरही 0.50 पैसे ते 1 रुपयापर्यंतची कपात केली जात आहे. यूपीआय पेमेंटमुळे सुट्ट्या पैशांची समस्या येणार नाही. पनीरसारख्या उत्पादनांचे नवीन किमतीसह उत्पादन सुरू झाले आहे, असे मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बंडलिश यांनी सांगितले.

* खतांचे दर कमी; शेतकर्‍यांना थेट फायदा

जीएसटी परिषदेने खते आणि कृषी रसायनांवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता सल्फ्युरिक सिड, नायट्रिक सिड, अमोनिया, बायो-पेस्टिसाईड्स आणि मायक्रोन्युट्रिएंट्स यांसारख्या महत्त्वाच्या कृषी उत्पादनांवर पूर्वीच्या 12% ते 18% जीएसटीच्या तुलनेत केवळ 5% जीएसटी लागेल. हा निर्णय 22 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून लागू झाला आहे. जीएसटी कमी झाल्यामुळे उत्पादने स्वस्त होतील, ज्यामुळे शेतकरी जैविक आणि शाश्वत शेतीकडे अधिक सहजतेने वळू शकतील. हा निर्णय सरकारच्या ग्रीन अॅग्रीकल्चर धोरणाशी सुसंगत आहे.

* टाटा, महिंद्राच्या गाड्या दीड लाखानं स्वस्त

GST 2.0 आजपासून भारतात लागू झाला असून, ऑटोमोबाईल ग्राहकांसाठी ही एक मोठी राहत आहे. या नव्या जीएसटी दरांमुळे वाहन उत्पादक कंपन्यांनी किमती थेट कमी करत याचा लाभ ग्राहकांपर्यंत दिला आहे. आता प्रवेशस्तरावरील हॅचबॅकवर 40,000 रुपयांपर्यंत आणि लक्झरी एसयूव्हीवर तब्बल 30 लाख रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे हे भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वात मोठे किंमत बदल ठरत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button