येणार्या अनेक वर्षांसाठी पंतप्रधानपदासाठी जागा रिक्त नाही
राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

* 2047 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्व करणार
नवी दिल्ली/21 सप्टेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी 2047 मध्ये विकसित भारत होईपर्यंत देशाचे नेतृत्व करतील, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. एका मुलाखतीमध्ये 2029 मध्ये भाजपचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न विचारला असता, राजनाथ सिंह म्हणाले की, 2029, 2034, 2039, 2044 आणि 2047 मध्ये विकसित भारत होईपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच चेहरा असतील. राजनाथ सिंह म्हणाले की, सध्या आणि येणार्या अनेक वर्षांसाठी पंतप्रधानपदाची जागा रिक्त नाही, कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, नरेंद्र मोदी येत्या अनेक वर्षांसाठी पंतप्रधान राहतील. ते निर्विवाद आहेत आणि ते तसेच राहतील. येणार्या अनेक निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदाची जागा रिक्त राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींशी असलेल्या त्यांच्या संबंधांवरही चर्चा केली. त्यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान मोदींशी त्यांचे जवळजवळ 35 वर्षांपासूनचे संबंध आहेत. आम्ही पहिल्यांदा झाशीमध्ये भेटलो होतो. तेव्हापासून आणि आजपर्यंत अनेक बदल दिसून आले आहेत. विशेषतः पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी अनेक जटिल निर्णय घेतले आहेत, जे कोणीही घेण्याचा विचार करणार नाही. ते सर्वात मोठ्या आव्हानांना तोंड देऊनही मागेपुढे पाहत नाहीत. ही त्यांची क्षमता आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.




