बौद्ध व आंबेडकरी संघटनांचा जनआक्रोश मोर्चा
तीन पवित्र स्थळांच्या मुक्तीसाठी राष्ट्रव्यापी आंदोलन

-जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
अमरावती / 17 सप्टेंबर : बौद्ध व आंबेडकरी समाजासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या बिहार येथील महाबोधी महाविहार, नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी आणि मध्यप्रदेशातील महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमीच्या मुक्ततेसाठी आज देशव्यापी जनआक्रोश आंदोलन उभे ठाकले. भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखालील समता सैनिक दल, भिक्खु संघ तसेच वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अमरावती जिल्यातील सर्व बौद्ध व आंबेडकरी संघटनांनी जिलाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून शासनाच्या धोरणाचा निषेध केला.
आज दुपारी साडेबारा वाजता इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व स्मारक परिसरातून मोठ्या संख्येने बहुजन समाजाच्या सहभागाने विशाल मोर्चा निघाला. घोषणाबाजी व उत्साहाच्या वातावरणात काढलेल्या या मोर्चाने जिलाधिकारी कार्यालयावर धडक देत समाजाच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात बौद्ध व आंबेडकरी संघटनांनी स्पष्टपणे नमूद केले की, महाबोधी महाविहार (बिहार), नागपूरची दीक्षाभूमी व महू (मध्यप्रदेश) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी या तिन्ही पवित्र भूमी सध्या गैरबौद्धांच्या ताब्यात आहेत. या भूमींना त्वरित मुक्त करून त्यांचे व्यवस्थापन व नियमन यांची जबाबदारी केवळ बौद्ध समाजाकडे सोपवावी, ही प्रमुख मागणी संघटनांनी केली.
आंदोलनाच्या वेळी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात विजय चौरपगार, प्रा. प्रकाश बोरकर, प्रा. डॉ. मुकेश सरदार, संजय चौरपगार, राहुल मेश्राम, माया धांडे, संगीता सरदार, गणपत तिडके, प्रा. डॉ. रमेश बडगे, प्रा. डॉ. प्रमोद भालेराव, ललित कांबले, मालती मेश्राम, निर्मला नागले, पूजा वानखडे, उमा वानखडे, रमेश आठवले व आनंद इंगले यांचा समावेश होता.




