विदर्भासह मराठवाडा, प. महाराष्ट्रात ढगफुटी सदृश्य तडाखे
महाराष्ट्रावर कोसळला मुसळधार पावसाचा कहर

-शहरं जलमय, शेती उद्ध्वस्त, जनजीवन विस्कळीत
नागपूर / 15 सप्टेंबर : गेल्या दोन-तीन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात निसर्गाने रौद्ररूप धारण केले आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा सर्वच भागांमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः धडक दिली आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, पाण्याचा विसर्ग आणि नद्यांना आलेले महापूर यामुळे गावोगाव पुरस्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील कापूस, सोयाबीन, तूर यांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, अनेक शहरात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले तर काही भागात झाडे, घरे कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. प्रशासन, नागरिक आणि बचाव पथके सतत सतर्क आहेत; तरीही निसर्गाच्या या प्रकोपापुढे बहुतांश ठिकाणी मानवी असहाय्यता स्पष्टपणे जाणवली.
सोमवारी दुपारी नागपूर शहरावर वादळी पावसाचे थैमान उसळले. दुपारी 2 च्या दरम्यान विजांच्या गडगडाटासह तासाभराहून अधिक वेळ मुसळधार पाऊस झाला. वर्धा रोड, नरेंद्रनगर, धंतोली, कोराडी रोड परिसर जलमय झाला. मॉडर्न स्कूलच्या पटांगणात ‘तलाव’ तयार होऊन विद्यार्थ्यांना दोर टाकून सुरक्षित बाहेर काढावे लागले. रनवेवर पाणी साचल्याने विमानवाहतुकीवरही परिणाम झाला. चंद्रपूर शहरात मुसळधार पावसाबरोबरच वार्याचा तडाखाही जाणवला. प्रियदर्शनी चौक परिसरात दोन झाडे कोसळली. एका दुचाकीवर झाड पडून ती चक्काचूर झाली. शेतकरी वर्ग पावसाच्या तडाख्याने त्रस्त असून खरीप हंगाम धोक्यात आल्याची भीती आहे.
खानदेशात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे बामणी व दगडी नदीला पूर आला. गावातील नाल्यापलीकडे अडकलेले विद्यार्थी व शिक्षक गावकर्यांनी बाहेर काढले. सांगली, मिरज परिसरातही दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. थेऊर परिसरात रस्ता खचल्याने संपर्क तुटला आहे. कोकण आणि तळकोकणात आज सर्वच जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले. पुणे, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर जिल्ह्यातही ढगफुटी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती.
निसर्गाच्या या मुसळधार धडकीने महाराष्ट्र हादरला आहे. पावसाची तीव्रता पाहता पुढील काही दिवस धोक्याचे ठरू शकतात, असा इशारा हवामान विभागाने दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-बुलढाण्यात गावांचा संपर्क तुटला
बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यात मुसळधार पावसानंतर पाताळगंगा नदीला पूर आला. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यात रिसोड, मालेगावसह अनेक गावांमध्ये अतिवृष्टी झाली. सोयाबीन, कापूस, तूर पिके उद्ध्वस्त झाली आहेत. आधीच कोसळलेल्या खरिपात आता नव्या पावसाने आणखी हानी केली आहे.
-बीड: हेलिकॉप्टरने नागरिकांची सुटका
बीड जिल्ह्यात आष्टी व कडा भागात ढगफुटीजन्य पाऊस झाला. अनेक कुटुंबे रात्री पूरात अडकली होती. स्थानिक आमदारांच्या मागणीनंतर हेलिकॉप्टरच्या साहाय्याने त्यांची सुटका करण्यात आली. शिरूर कासार तालुक्यात सीना नदीला पूर येऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. जेथे लोक अडकली आहेत, तेथे त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरु आहे.




