रुग्ण व त्याच्या कुटुंबाप्रति संवेदनशीलता जपा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करून दिली जाणीव, एम्सचा दुसरा दीक्षांत सोहळा

नागपूर/15एप्रिल– डॉक्टरांना अनेकदा आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करावा लागतो. तरीही, अशा परिस्थितीतही त्यांनी रुग्ण व त्याच्या कुटुंबाप्रति संवेदनशीलता जपली पाहिजे. रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनीही वैद्यकीय व्यावसायिकांना नेहमी आदराने वागवले पाहिजे. डॉक्टर व रुग्ण यांच्यातील विश्वासाचे नाते टिकवून ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे, अशी जाणीव राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे करून दिली.
मिहानमधील अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्न) दुस्या दीक्षांत सोहळ्यात त्या बोलत होत्या. राज्यपाल जिष्णूदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रताप जाधव, एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी, अध्यक्ष डॉ. प्रशांत पंधरे याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रपती म्हणाल्या की, वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावाबरोबरच आयुष्यभर शिकत राहण्याची वृत्ती जपायला हवी. वैद्यकीय क्षेत्रात नैतिक मूल्यांचे स्थान सर्वतोपरी आहे. जिज्ञासा, संशोधन व सतत शिकत राहण्याची वृत्ती आत्मसात करा. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ते करुणा, प्रामाणिकपणा व रुग्णकेंद्रित दृष्टिकोनाची जागा घेऊ शकत नाही. वैद्यकीय क्षेत्रात यशासह करुणेचा भाव जपल्यास तुम्ही एक उत्तम व्यक्तीही होऊ शकेल. वैद्यकीय क्षेत्र केवळ एक व्यवसाय नसून संवेदनशीलतेने मानवतेची सेवा करण्याचा एक मार्गही आहे. एक वैद्यकीय चिकित्सक केवळ आजारांवर उपचार करत नाही, तर तो आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीच्या मनात आशेचा संचारही निर्माण करतो. चिकित्सकाचा सहानुभूतीचा सल्ला केवळ आजारी व्यक्तीलाच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयांनाही आधार देतो. आरोग्य क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल आरोग्य सेवा, प्रगत संशोधनाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती होत आहे. आपण हे बदल आत्मसात करून पुढे वाटचाल केली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.राज्यपाल जिष्णूदेव वर्मा-मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार व कर्करोगासारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांमध्ये सध्या मोठी वाढ होत आहे. नैराश्य, चिंता आणि व्यसनाधीनतेसारख्या मानसिक आजारांच्या समस्यांकडेही गांभीर्याने पुरविण्याची गरज निर्माण झाली असून आयुष्यमान भारतसारख्या योजनांमुळे लोक दर्जेदार आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी शासकीय रुग्णालयांकडे वळत आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.




