आता प्रशासकीय कामाचा कारभार प्रभार्यांच्या खांद्यावर
अमरावती मनपात आठशे सत्तर पदे रिक्त

तृतीय श्रेणीतील पाचशे अठ्ठ्याहत्तर जागा रिकाम्या
दोन हजार पदांपैकी केवळ बाराशे कार्यरत
अमरावती/21एप्रिल– अमरावती महानगरपालिका सध्या आर्थिक चणचणीसोबतच मनुष्यबळाच्या तीव्र टंचाईचा सामना करत आहे. महापालिकेच्या एकूण 2 हजार 87 मंजूर पदांपैकी तब्बल 871 पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर याचा विपरीत परिणाम झाला आहे. सध्या केवळ 1 हजार 216 अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून, अनेक विभागांचा कार्यभार अतिरिक्त प्रभारावर सोपवण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकार्यांपासून ते सफाई कामगारांपर्यंत सर्वच स्तरावर रिक्त पदांचे मोठे ग्रहण लागल्याने शहराच्या विकासकामांना खीळ बसली असून, सामान्य नागरिकांची कामे रखडल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. महानगरपालिकेच्या आस्थापना विभागात कोणत्या संवर्गात किती पदे रिकामी आहेत आणि कोणाकडे अतिरिक्त पदभार आहे, या संदर्भात नगरसेविका मिनल सवई यांनी महापालिकेच्या आमसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना प्रशासनाने महापालिकेच्या रिक्त पदांचा पाढाच वाचला. महापालिकेत गट-अ संवर्गातील अधिकार्यांची 42 पदे मंजूर असून त्यापैकी 28 पदांवर अधिकारी नियुक्त आहेत, तर 14 पदे अद्यापही रिक्त आहेत. यामध्ये उपायुक्त (2 पदे), शहर अभियंता (1), उपअभियंता यांत्रिकी व परिवहन (1), मुख्य लेखाधिकारी (1), पर्यावरण..संवर्धन अधिकारी (1), मूल्य निर्धारण व कर संकलन अधिकारी पशु शल्य चिकित्सक (1), मुख्य अग्निशमन अधिकारी (1), वैद्यकीय अधिकारी (1), स्त्रीरोग तज्ज्ञ (1), बालरोग तज्ज्ञ (1), मुख्य संगणक अधिकारी (1) आणि मुख्य स्वच्छता अधिकारी (1) या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. ही सर्व पदे रिक्त असल्याने समकक्ष अधिकार्यांकडे या विभागांचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला असून, त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे.
गट-ब संवर्गातील स्थिती तर अधिकच गंभीर आहे. या गटात एकूण 73 पदे मंजूर असताना केवळ 23 पदांवर नियुक्ती आहे, तर 50 पदे रिक्त आहेत. यात सहाय्यक आयुक्त (8 पदे), महिला व बालविकास अधिकारी (1), सांख्यिकी अधिकारी (1), उपशिक्षणाधिकारी (1), सहाय्यक मूल्य निर्धारण व कर संकलन अधिकारी (1), विधी अधिकारी (1), सहाय्यक पर्यावरण अधिकारी (1), उपमुख्य लेखा परीक्षक (1), लेखाधिकारी (1), सहाय्यक अग्निशमन अधिकारी (1), महानगरपालिका सचिव (1), लघुलेखक निवड श्रेणी (1), लघुलेखक उच्च श्रेणी (1), नगर रचनाकार (1), सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (15), उपमुख्य स्वच्छता अधिकारी (2), सहाय्यक अभियंता स्थापत्य (6), शाखा अभियंता स्थापत्य (3), सहाय्यक अभियंता विद्युत (1), मालमत्ता व्यवस्थापन अधिकारी (1) आणि अतिक्रमण पथक प्रमुख (1) या पदांचा समावेश आहे. महत्त्वाची पदे रिक्त असल्याने धोरणात्मक निर्णय घेताना अडचणी येत आहेत.
तृतीया श्रेणी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांच्या बाबतीतही आनंदी आनंदच आहे. गट-क अंतर्गत 922 मंजूर पदांपैकी केवळ 344 पदे भरलेली असून 578 पदे रिक्त आहेत. काही विभागात तर एकही कर्मचारी शिल्लक नसल्याची स्थिती आहे. तसेच गट-ड संवर्गातील 1 हजार 50 मंजूर पदांपैकी 821 पदे कार्यरत असून 229 पदे रिक्त आहेत. यामध्ये प्रामुख्याने सफाई जमादार, बीट शिपाई आणि सफाई कामगारांचा समावेश आहे. ही पदे रिक्त असल्याने शहराच्या स्वच्छतेवर आणि दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. मनुष्यबळाच्या या कमतरतेमुळे महापालिकेचा गाडा हाकायचा तरी कसा, असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.




