‘मुले जन्माला घाला,’ पण ती पोसणार कोण?
उध्दव ठाकरेंचा मोहन भागवत आणि भाजप सरकारवर निशाणा

मुंबई/21एप्रिल- महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रनचेवरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजप सरकारवर कडाकडून हल्लाबोल केला आहे. तसेच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी वाघिणीसारख्या लढत आहेत, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. ते भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, 19 जून 1966 साली शिवसेनेची सुरूवात झाली. त्यावेळी दत्ता साळवींनी नोकरीचा राजीनामा देऊन शिवसेनेसोबत कामाला सुरूवात केली. याच दत्ता साळवींनी भारतीय कामगार सेनेचं नेतृत्त्व करून हजारो, लाखो लोकांच्या आयुष्यात उजेड पाडला. याला धाडस, हिंमत आणि जिद्द म्हणतात.
दिवस येतात, दिवस जातात. लोक येतात, लोक जातात. त्यांची कर्म आणि पाप त्यांच्यासोबत जातात. आज एकूण वकवक चालली आहे. सगळं मला पाहिजे, असं काहींना वाटतंय. भारतीय कामगार सेनेला 58 वर्षे झाली आहेत. या 58 वर्षांत आपण कामगारांचा विश्वासघात होईल, असे एकही काम केले नाही. कदापी होणारही नाही. आता नवीन दुकाने उघडली जात आहेत. जिकडे खरेदी आणि विक्रीची कामे केली जातात. लोक विकत घेतले जात आहे. युनियन म्हणजे नाण्याची दुसरी बाजू असते. यांचे लक्ष फक्त नाण्याकडे आहे, दुसर्या बाजूकडे नाही. मालकाच्या खिशातलं नाणं पाहिजे, अशी युनियन क्षेत्रात भागिदारी झाली आहे. चांगली चाललेली युनियन फोडली जाते. मग मालकाच्या दावणीला बांधायची, मालक म्हणेल तसे उठबस करायचे. ही पद्धत सुरू झाली आहे. सगळेच उद्योग, कंपन्या, हॉटेल, कारखान्याचे मालक शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याईने माझ्या ओळखीचे आहेत. पण, माझे नाते गेटवर लागलेल्या भगव्याशी आहे. मालकाशी नाही. त्या भगव्याला हात लावणार्याचे तुकडे कसे करायचे, ही जबाबदारी भारतीय कामगार सेनेची आहे. मी एवढ्या परखपणे वागतोय, तर तुम्ही कसं वागलं पाहिजे. कामगारांची परिस्थिती वाईट झाली आहे. इराण आणि अमेरिका युद्ध सुरू झाले आहे. हे युद्ध कधी थांबणार काय माहिती? दुबईत अनेक उत्तर प्रदेशातील लोक काम करत आहेत. त्यातील एकाने म्हटलं, घरी जाण्यापेक्षा इकडे बॉम्बने मरू. माझ्या देशातले कामगारांना इकडच्या राज्यातून तिकडे का जावं लागतंय? हेही कमी काय म्हणून बाहेर देशात का जावं लागतंय? ही एवढी परिस्थिती आपल्याकडे आली आहे. तरीही राज्यकर्त्यांच्या डोक्यात घुसत नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
ममतांच्या पराभवासाठी 2 लाखां… सीआरपीएफ तैनात
भाजप नेतृत्वातील केंद्र सरकारने पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करण्यासाठी दोन लाखांहून अधिक सीआरपीएफ जवान तैनात केले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. आपल्या पक्षाची कामगार संघटना भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेला ते बोलत होते.ठाकरे म्हणाले, अंमलबजावणी संचालनालय ममता बॅनर्जी यांच्या जवळच्या व्यक्तींवर छापे टाकत आहे.




