191 कोटींच्या उड्डाणपुलाला 24 तासातच बंदीची नामुष्की
गडकरी-फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

-अमरावती मार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी उभारणी
नागपूर / 14 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी थाटामाटात उद्घाटन झालेल्या अमरावती मार्गावरील ‘ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपुला’ला अवघ्या 24 तासांतच बंद करण्याची नामुष्की ओढावी लागली. तब्बल 191 कोटींहून अधिक खर्चून बांधण्यात आलेल्या या उड्डाणपुलावर उद्घाटन सोहळ्यानंतरचे मंच, बॅरिकेड्स आणि साहित्य पडून राहिल्याने वाहनचालकांची सकाळपासूनच तारांबळ उडाली.
शनिवारी सकाळी बोले पेट्रोल पंपाजवळ झालेल्या किरकोळ अपघातानंतर नागरिकांत संभ्रम निर्माण झाला. काहींनी यालाच पुलबंदीचे कारण ठरवले, तर काहींनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर रोष व्यक्त केला. मात्र वाहतूक पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी मोठा अपघात घडलेला नाही. पुलावर किरकोळ अपघात झाला, पण गंभीर दुखापती नाहीत. पुल बंद करण्याचे आदेश वाहतूक विभागाने दिलेलेच नाहीत. केवळ वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आली आहेत, असे स्पष्ट केले.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता नरेश बोरकर यांनी सांगितले, उद्घाटनानंतर लगेच साफसफाईचे काम सुरू झाले होते. मात्र रात्रीच्या पावसामुळे कामाला उशीर झाला. शनिवार रात्रीपर्यंत सर्व साहित्य हटवले जाईल. सकाळपासून उर्वरित पेंडल आणि बॅरिकेट्स हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बोले पेट्रोल पंप चौकापासून सुरू होऊन आरटीओ कार्यालय, विद्यापीठ परिसर, फुटाळा चौकापर्यंत जाणारा हा पूल एकूण 2.85 किमी लांबीचा असून वाहतुकीच्या मोठ्या प्रमाणातील कोंडी दूर करण्यासाठी याची उभारणी झाली आहे. वाहनांसाठी कमाल 80 किमी प्रतितास वेगमर्यादा ठरवण्यात आली आहे.
या पुलाच्या उभारणीत मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर करून 65 मीटर लांबीचे, तब्बल 250 टन वजनाचे सहा गर्डर्स लॉ कॉलेज चौकात बसवण्यात आले. पुलावर 766 सेग्मेंट्स उभारले गेले आहेत. पुल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर अमरावती मार्गावरील पाच किलोमीटरचे अंतर अवघ्या पाच मिनिटांत पार करता येणार आहे. अमरावती मार्गावर गर्दी कमी करण्यासाठी मे 2021 मध्ये दोन उड्डाणपुलांच्या कामास सुरुवात झाली. त्यातील वाडी पोलिस ठाणे ते गुरुद्वारा (1.95 किमी) उड्डाणपूल आधीच सुरू झाला आहे. दुसरा आणि मोठा पूल, म्हणजे आरटीओ कार्यालय ते विद्यापीठ कॅम्पस (2.85 किमी) हा ‘ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपूल’ अद्याप काही कामे प्रलंबित ठेवून वाहतुकीसाठी उघडण्यात आला.




