शेतकरी प्रश्नांवर दुर्लक्ष, सामाजिक सलोख्यावर संकट

शरद पवारांची सरकारांवर जोरदार टीका

-परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह
-नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ता शिबीर
नाशिक / 14 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये आयोजित केलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात केंद्र आणि राज्य सरकारवर गंभीर टीका केली. शेतकर्‍यांशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. कांदा निर्यातीवर बंदी असल्यामुळे शेतकर्‍यांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, नाशिक जिल्हा बँकेच्या प्रचंड थकबाकीबाबत चिंता व्यक्त केली.
शरद पवार म्हणाले, केंद्रातील सत्ताधारी शेतकर्‍यांच्या समस्या गांभीर्याने घेत नाहीत. शेतकर्‍यांच्या संघटनांना अधिकच मजबूत करणे अत्यावश्यक आहे. त्यांनी नाशिकच्या शेतकर्‍यांचे कौतुक करत येथे आधुनिक शेती व नवनिर्मित प्रयोग झपाट्याने होत असल्याचे सांगितले. शरद जोशी नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलनाची सुरुवात नाशिकमधूनच झाली होती, हीही आठवण त्यांनी दिली.
याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पवारांनी म्हटले, देशाच्या शेजारच्या देशांमध्ये (पाकिस्तान, नेपाळ) सध्या गंभीर अडचणी आहेत. बांगलादेश आणि श्रीलंका देखील आपल्याबरोबर नाहीत. यामुळे परराष्ट्र धोरणावर अधिक विचार करणे आवश्यक आहे. ट्रम्प यांच्या वस्तूंवर टॅक्स लादण्याच्या धोरणाचा उल्लेखही त्यांनी केला. महाराष्ट्रातील मराठा आणि ओबीसी आरक्षण वादांबाबत पवारांनी सामाजिक सलोख्याबाबत चिंता व्यक्त केली. महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवत आहे, ही चिंता वाढवणारी बाब आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. बंजारा समाजसह इतर समुदायांना आदिवासी विभागात समाविष्ट करण्याच्या मागणीमुळे समाजात कटूता वाढण्याचा धोका असल्याचेही त्यांनी सांगितले.
शासनाने आरक्षणासाठी बनवल्या जाणार्‍या समित्यांमध्ये एका जातीच्या लोकांच्याच प्रतिनिधी असू नयेत, सर्वसमावेशक समित्या असाव्यात, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी समिती व मराठा समितीमध्ये एकाच समाजाचे नेते असल्यामुळे नाराजी व्यक्त केली.
-पक्षावर गांधी-नेहरु विचारांचा प्रभार
शरद पवार यांनी नाशिकच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेत आपल्या पक्षाचा विचार गांधी-नेहरू विचारसरणीवर आधारित असल्याचा उल्लेखही केला. त्यांनी महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत झालेल्या अधिवेशनांची आठवण केली. तसेच, महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणसारखे नेते देण्याचे श्रेय नाशिक जिल्ह्याला दिले. शरद पवार यांनी नाशिकच्या शेतकरी, समाज आणि राजकारणातील सध्या उठलेल्या बहुसंख्य प्रश्नांवर केंद्रीय आणि राज्य सरकारला तोंड दाखवले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button