ईशान्य भारतात भूकंप, आसाममधील उदलगुरी केंद्रस्थानी
शेजारील राज्यांतही जाणवले धक्के

-5.8 रिश्टर स्केल तिव्रतेची नोंद
-जीवितहानी नाही, नागरिक भयभीत
गुवाहटी / 14 सप्टेंबर : ईशान्य भारत पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. आसाममधील उदलगुरी जिल्हा येथे आज दुपारी 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (छउड) माहितीनुसार, दुपारी 4 वाजून 41 मिनिटांनी हा भूकंप झाला. भूकंपाची खोली केवळ 5 किलोमीटर असल्याने धक्के तीव्रतेने जाणवले. अचानक जमिनीला हादरे बसल्याने नागरिक घाबरून घराबाहेर धावताना दिसले.
भूकंपानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांच्या चेहर्यावर स्पष्ट धास्ती दिसत होती. मात्र सुदैवाने, या भूकंपात आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाल्याची नोंद नाही. प्रशासनाकडून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जात असून, लोकांना अफवांकडे लक्ष न देण्याचे व सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भूकंपाचे केंद्र उदलगुरी जिल्हा असले तरी, आसामसह मेघालय, नागालँड, मणिपूर, बंगाल आणि भूतान पर्यंत धक्के जाणवले. त्यामुळे या राज्यांतील लोकांमध्येही भीती पसरली.
आसाममधील हा भाग भूकंप संवेदनशील क्षेत्रात मोडतो. कारण, हा परिसर पूर्व हिमालयीन पर्वतरांगांमध्ये युरेशियन व सुंदा प्लेट्सच्या टकरीच्या सीमारेषेवर स्थित आहे. काही दिवसांपूर्वीच आसामच्या सोनितपूर येथे 3.2 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यामुळे या भागातील लोकांना भूकंपाचे धोके नेहमीच जाणवत असतात. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानात शक्तिशाली भूकंप झाला होता ज्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला होता. आता भारतातील ईशान्य भागात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. ईशान्य भारत भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने सतत सजग राहणे, सुरक्षित ठिकाणी तात्काळ हलणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे.




