अप्पर वर्धा धरणातील विसर्गात घट

आज फक्त पाच दरवाजे उघडले

-परिसरात पर्यटकांचा उत्साह
-रविवारमुळे नागरिकांची मोठी गर्दी
मोर्शी / 14 सप्टेंबर : अप्पर वर्धा धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग सध्या घटला असून यामुळे परिसरात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. 12 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता धरणाचे सर्व 13 दरवाजे प्रत्येकी 40 सेंटीमीटरने उघडण्यात आले होते. त्यातून तब्बल 844 घनमीटर प्रति सेकंद इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता. मात्र त्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर थांबल्याने आवक कमी झाली आणि परिणामी विसर्गातही कपात करण्यात आली.
आज 14 सप्टेंबर रोजी फक्त पाच दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडे ठेवण्यात आले असून केवळ 162 घनमीटर प्रति सेकंद इतका विसर्ग सुरू आहे. विसर्गात घट झाल्याने नदीपात्रातील पाण्याचा वेग काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. या दरम्यान निर्माण होणारे तुषार आणि धरणाचे रमणीय दृश्य पाहण्यासाठी रविवारी मोठ्या संख्येने पर्यटकांनी परिसरात गर्दी केली होती. पावसाळी वातावरण, धरणातून खाली कोसळणारे पाणी, उडणारे तुषार आणि थंडगार वार्‍यामुळे पर्यटक मंत्रमुग्ध झाले होते.
जलसंपदा विभागाच्या अधिकृत माहितीनुसार सध्या धरणातील एकूण पाणी साठा समाधानकारक आहे, मात्र आवक कमी झाल्यामुळे विसर्ग नियंत्रित ठेवावा लागत आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्यास विसर्गात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे, अन्यथा सध्या सुरू असलेली विसर्गाची मर्यादित गतीच कायम राहण्याची चिन्हे आहेत. धरणातील पाणीपुरवठा हा केवळ सिंचनासाठीच नव्हे तर परिसरातील पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा महत्त्वाचा असल्याने प्रत्येक घडामोडीकडे नागरिकांसह प्रशासनाचे लक्ष लागलेले आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी धरण परिसरात हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला.

संबंधित बातम्या

Back to top button