डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भीमगीतांचा कार्यक्रम
कलाकारांच्या प्रबोधनातून उलगडणार बाबासाहेबांचे कार्य

गायक दीपक इंगळे यांची राहणार मुख्य उपस्थिती
अमरावती/6 एप्रिल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून अमरावतीच्या सांस्कृतिक पटलावर एक भव्य भीमगीतांचा कार्यक्रम पार पडणार आहे. प्रबुद्ध बहुउद्देशीय संस्था, राष्ट्रीय आंबेडकरी कलावंत प्रबोधन परिषद आणि अखिल भारतीय समता संगीत कलावंत मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच, आंबेडकरी विचारांचा वारसा जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा मुख्य उद्देश आयोजकांनी ठेवला आहे. विशेष म्हणजे, ज्या कलावंतांनी फुले, शाहू आणि आंबेडकरी प्रबोधनासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, अशा वृद्ध कलाकारांचा या सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे. तसेच धम्म प्रसारक आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणार्या व्यक्तींचाही यावेळी विशेष सन्मान केला जाईल. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि राष्ट्रीय आंबेडकरी कलावंत प्रबोधन परिषदेचे शहराध्यक्ष गायक दीपकभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा दोन सत्रांत रंगणार आहे. सकाळी 10:30 वाजता बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर मान्यवरांचे सत्कार आणि वक्त्यांचे प्रबोधन पार पडेल. या पहिल्या सत्रात ग्रामीण भागातील नवोदित गायक आपली कला सादर करतील. दुपारच्या सत्रात सायंकाळी 4:00 ते रात्री 10:00 या वेळेत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक दीपकभाऊ इंगळे आणि त्यांचा संच भीमगीतांच्या माध्यमातून प्रबोधनाचा जागर करतील. हा कार्यक्रम इर्विन चौक परिसरातील डॉ. बाबासाहेब चौक येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेजारी संपन्न होणार असून, संपूर्ण परिसरातील आंबेडकरी अनुयायी आणि रसिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




