संतप्त नागरिकांचे कठोरा रिंग रोडवर ठिय्या आंदोलन
अस्वच्छतेवरुन मनपाविरोधात संताप

-आ. सुलभा खोडके यांचा प्रशासनाला इशारा
-जनतेच्या आरोग्याशी हयगय खपवून घेणार नाही
अमरावती / 14 सप्टेंबर : कठोरा रिंग रोड जकात नाका परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना अस्वच्छता, घाणीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या घंटी कटल्यातून संकलित केलेला कचरा येथे खुल्या जागेत टाकण्यात येत असल्याने परिसरात जणू डम्पिंग डेपोच निर्माण झाला आहे. कचर्याचे ढीग, पसरलेली घाण आणि सर्वत्र दरवळणारी दुर्गंधी यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून आरोग्य धोक्यात आले आहे. याविरोधात स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी आज कठोरा रिंग रोडवर ठिय्या आंदोलन छेडत आपला प्रखर रोष व्यक्त केला.
आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली. वाहनचालक त्रस्त झाले, तर तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांच्या या संतापाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरही खळबळ उडाली. परिस्थितीची माहिती मिळताच अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके स्वतः आंदोलनस्थळी दाखल झाल्या. त्यांनी कार्यकर्त्यांची मते व तक्रारी जाणून घेतल्या. कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, दररोज घंटी कटल्यातील कचरा कठोरा रिंग रोडलगतच्या मोकळ्या जागेत टाकण्यात येतो. यामुळे घाण पसरते, डास-माशांचा त्रास वाढतो, दुर्गंधी दरवळते आणि प्रवाशांना व नागरिकांना अस्वस्थ वातावरणाचा सामना करावा लागतो. शाळेत जाणार्या मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी आमदार खोडके यांनी महापालिका आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांच्याशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक आणि स्वच्छता वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी झालेल्या चर्चेत आमदार खोडके यांनी अधिकार्यांना स्पष्ट सूचना केल्या की, परिसरातील कचरा तात्काळ उचलण्यात यावा. तसेच कठोरा परिसरातील लोकवसाहतीत घंटी कटल्याचा कचरा टाकू नये, त्यासाठी शहराबाहेरील निर्मनुष्य जागी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. त्यांनी प्रशासनाला ठाम अल्टीमेटम दिला की, नागरिकांच्या आरोग्याशी हयगय खपवून घेणार नाही. कचर्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि नियोजनबद्ध स्वच्छता ठेवणे ही मनपाची जबाबदारी आहे, ती प्रभावीपणे पार पाडावी.
-आश्वासनानंतर आंदोलन मागे, वाहतूक सुरळीत
मनपा प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आश्वासन दिल्यानंतर आमदार सुलभा खोडके यांच्या मध्यस्थीने कार्यकर्त्यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. नागरिकांनीही समाधान व्यक्त करत आमदार सुलभा खोडके आणि यश खोडके यांचे आभार मानले. यानंतर परिसरातील तणाव शमला आणि वाहतूक व्यवस्था पुन्हा सुरळीत झाली.
-नागरिकांची भावना
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबत कचरा व्यवस्थापनाच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहेत. कठोरा रिंग रोडसारख्या महत्त्वाच्या मार्गालगत कचरा टाकल्याने फक्त दुर्गंधीच नाही तर अपघाताचा धोका, रोगराईचा फैलाव, मुला-बाळांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. कचरा व्यवस्थापनाची नीट सोपी, शास्त्रशुद्ध पद्धत महापालिकेने स्वीकारली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




