16 सप्टेंबरपर्यंत सलग पावसाचा अंदाज
मुसळधार सरींनी उकाडा कमी

-तापमानात लक्षणीय घसरण
अमरावती / 12 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा भरून राहिला होता. नागरिक पावसाच्या प्रतिक्षेत हैराण झाले होते. गुरुवारी सकाळीही ऊन तळपत होते. मात्र दुपारनंतर हवामानाने अचानक पलटी घेतली. आकाशात काळे-कुट्ट ढग दाटले, विजांच्या गडगडाटासह झमाझम पाऊस सुरू झाला. पावसाच्या आगमनाने तापमानात झपाट्याने घट झाली आणि वातावरण थंडगार बनले. त्यामुळे नागरिकांना उमसापासून दिलासा मिळाला.
12 सप्टेंबर रोजीही अमरावतीसह जिल्यात पावसाच्या सरी कायम होत्या. पुढे 16 सप्टेंबरपर्यंत सतत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू राहतील, असे स्थानिक हवामान तज्ज्ञ प्रा. अनिल बंड यांनी स्पष्ट केले. विशेषतः पूर्व विदर्भ, यवतमाळ व वाशिम जिल्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावर्षीचा मान्सून विदर्भासह संपूर्ण देशासाठी समाधानकारक ठरला आहे. ऑगस्ट महिन्यात उत्कृष्ट पावसामुळे धरणे, तलाव व नदी-नाले पाण्याने खचाखच भरलेले दिसत आहेत. त्यामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून शेतीलाही दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी अमरावतीत 27 मिमी पाऊस नोंदवला गेला. त्यामुळे अमरावतीचे कमाल तापमान घसरून 32.4 अंश सेल्सिअस इतके झाले. वाशिम जिल्यात किमान 28.6 अंश तापमान नोंदले गेले. वर्धा (20 मिमी), गोंदिया (19 मिमी) व नागपूर (11 मिमी) येथेही पाऊस झाला. त्यामुळे संपूर्ण विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचे कमाल तापमान खाली आले आहे. आता हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे पुढील काही दिवस विदर्भात पावसाळी वातावरण कायम राहणार असून, पुन्हा एकदा थंडावा अनुभवायला मिळणार आहे.




