विद्यापीठात ‘विद्यार्थी संवाद व गटचर्चा’ कार्यक्रम

महिला दिनानिमित्त गृहविज्ञान विभागाचा विद्यार्थीकेंद्री उपक्रम

अमरावती/16 मार्च – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा गृहविज्ञान विभाग आणि भारतीय जनसंचार संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यार्थी संवाद आणि गटचर्चा’ हा अभिनव उपक्रम नुकताच संपन्न झाला.
केवळ व्याख्यानांपुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या लघुपटांच्या माध्यमातून महिलांचे भावविश्व, त्यांच्या क्षमता आणि सामाजिक संघर्षावर अत्यंत प्रभावीपणे प्रकाश टाकला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सामाजिक जाणीव जागृती करणार्‍या या उपक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. वैशाली धनविजय होत्या. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनसंचार संस्थानचे प्राध्यापक डॉ. विनोद नितवाळे, डॉ. आदित्य मिश्रा, डॉ. प्रमोद गायकवाड, जयंत सोनवणे आणि डॉ. संयोगिता देशमुख यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी मोबाईल मधील विविध उप योजनांचा वापर करून चित्रीकरण, ध्वनी आणि संकलनाचे कौशल्य आत्मसात करत उत्कृष्ट लघुपट सादर केले. या लघुपटांमधून इतिहासातील लढाऊ स्त्रियांपासून ते आजच्या खेळाडू, छळाला सामोरे जाणार्‍या महिला, लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर आणि कुष्ठरोगी महिलांचे जीवन अशा अनेक पैलूंवर प्रभावी भाष्य करण्यात आले. डॉ. विनोद नितवाळे यांनी या निर्मिती प्रक्रियेतील तांत्रिक बाबींचे कौतुक केले, तर डॉ. प्रमोद गायकवाड यांनी ’एक नारी, सब पे भारी’ या ओळीचा अर्थ उलगडत स्त्री शक्तीवर कविता सादर केली. डॉ. वैशाली धनविजय यांनी लिंग समभावाचा विचार सातत्याने मांडला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनुश्री आडे हिने मानले. या उपक्रमासाठी सुमित गेदाम, दिपाली भैंसे, शिल्पा इंगोले, सुमेध वडोदकर, आयतल कामदार, क्षितिजा वानखडे, भक्ती सोंधिया, अशोक हिरे, वसंत इंगळे आणि चरणदास जामठे यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

Back to top button