वीजदरातील सवलत म्हणजे शेतकर्यांसाठी ‘मातीचा मोदक’
हा केवळ दिखावा, फायदा शून्य

-बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल
-शेतमालाच्या दरवाढीची मागणी
अमरावती / 9 सप्टेंबर : राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व प्रकारच्या उपसा सिंचन योजनांसाठी वीजदरात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची घोषणा होताच प्रहार जनशक्ति पक्षाचे संस्थापक, माजी आमदार व माजी मंत्री बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. हा निर्णय म्हणजे शेतकर्यांना ‘मातीचा मोदक’ देण्यासारखा आहे. या निर्णयातून राज्यातील शेतकर्यांना कोणताही ठोस दिलासा मिळणार नाही, असे स्पष्ट मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
त्यांनी सांगितले की, सरकार आज शेतकर्यांसाठी वीजदरात तात्पुरती सवलत देत असले तरी मार्च 2027 नंतर ही संपूर्ण सवलत सरकारकडून परत वसूल केली जाणार आहे. त्यामुळे हा निर्णय दीर्घकालीन दिलासा न देता केवळ फसवेगिरी ठरणार आहे. कर्जमाफीवर पुन्हा आक्रमक होत बच्चू कडू म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीसाठी अनेकवेळा आंदोलन, उपोषण, रास्ता रोको करण्यात आले. तरीही राज्य सरकार अजूनही कर्जमाफीबाबत कोणतीही ठोस घोषणा करण्यास तयार नाही. कर्जमाफीबाबत मौन बाळगून सरकार शेतकर्यांना वेठीस धरत आहे, हे दुर्दैवी आहे, असा आरोप त्यांनी केला.
सोयाबीन उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नालाही त्यांनी वाचा फोडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांना 6 हजार रुपये प्रती क्विंटल हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सध्या सरकारने फक्त 5025 रुपये प्रती क्विंटल किमान हमीभाव निश्चित केला आहे. त्यातही बाजारात सोयाबीनला केवळ 3400 रुपये क्विंटल इतका दर मिळत आहे. शेतकर्यांची ही प्रचंड फसवणूक आहे, असे ते म्हणाले.
कडू यांनी सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, शेतकर्यांना ‘मातीचा मोदक’ खाऊ घालण्याऐवजी त्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळाले पाहिजे. त्यासाठी तातडीने हमीभावात वाढ करून 6 हजार रुपये प्रती क्विंटल दर द्यावा तसेच संपूर्ण शेतकरी कर्जमाफी जाहीर करावी. अन्यथा प्रहार जनशक्ति पक्ष शेतकर्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरायला मागेपुढे पाहणार नाही.




