यंदाचे वर्ष शेतकर्‍यांसाठी आव्हानात्मक असणार

देशातील नेतृत्व कायम राहणार, संरक्षण यंत्रणांवर मोठा ताण राहण्याची शक्यता

ज्वारी, तूर, मूग, उडीद पिके साधारण

कापूस, तीळ आणि तांदूळ पिकांचे उत्पादन चांगले

भेंडवळ घटमांडणीचे भाकीत जाहीर

देशातील नेतृत्व कायम राहणार, संरक्षण यंत्रणांवर मोठा ताण राहण्याची शक्यता

बुलढाणा/20एप्रिल– बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे शेकडो वर्षांपासून जपली जाणारी घटमांडणीची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. या माध्यमातून वर्षभरातील पाऊस, शेती, देशातील राजकीय तसेच संरक्षण परिस्थितीबाबतचे अंदाज जाहीर करण्यात आले आहेत.
शेतीच्या दृष्टीने पाहता यंदाचे वर्ष शेतकर्‍यांसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे असल्याचे घटमांडणीतून स्पष्ट झाले आहे. अनेक पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून एकूण उत्पादनावर त्याचा परिणाम होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. मात्र कापूस, तीळ आणि तांदूळ या पिकांचे उत्पादन चांगले राहण्याची तसेच त्यांना योग्य भाव मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा या पिकांचे उत्पादन साधारण राहील असा अंदाज आहे. तर तीळ आणि बाजरी या पिकांची चांगली वाढ होईल असेही या भाकितात नमूद करण्यात आले आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबतही स्थैर्य कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून काही प्रमाणात अस्थिरता जाणवू शकते असे सूचित करण्यात आले आहे.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी घटमांडणी करून ती रात्रभर निरीक्षणात ठेवण्यात आली आणि दुसर्‍या दिवशी सूर्योदयावेळी तिचे निरीक्षण करून विविध निष्कर्ष काढण्यात आले.या अंदाजांनुसार देशातील सर्वोच्च नेतृत्व म्हणजेच पंतप्रधान आपल्या पदावर कायम राहतील, मात्र त्यांच्या कार्यकाळात तणावपूर्ण परिस्थिती कायम राहील असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. त्याचबरोबर देशाच्या संरक्षण यंत्रणांवर मोठा ताण राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून संरक्षण क्षेत्रातील स्थिती तुलनेने कमकुवत राहू शकते असा अंदाज मांडण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button