मुले पळविणार्या संशयित महिलेला पोलिसांनी पकडले, महिला पुन्हा फरार
अशोक नगरातील घटना, नागरिकांनी महिलेला दिला चोप

महिला मनोरुग्ण असल्याचा संशय
गाडगे नगर पोलिसांनी संशयित महिलेला घेतले होते ताब्यात
अमरावती/10 मे– स्थानिक अशोकनगर परिसरात लहान मुलीला एका अनोळखी महिलेने उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याने शनिवारी संध्याकाळी शहरभर भीतीचे सावट पसरले. मुलांना पळविणारी टोळी शहरात दाखल झाल्याची चर्चा वार्यासारखी पसरताच नागरिकांत मोठी धावपळ उडाली. गाडगेनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित महिलेला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
अश्विनी शैलेश वानखडे यांची लहान मुलगी रविवारच्या सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घरासमोरील बुद्धविहार परिसरात इतर मुलांसोबत खेळत होती. त्याच वेळी अस्ताव्यस्त अवस्थेतील एक महिला तेथे आली. काही क्षणांतच तिने खेळत असलेल्या बालिकेला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. क्षणार्धात मोठी गर्दी जमली. प्रसंगावधान राखत अश्विनी शैलेश वानखडे यांनी आपल्या मुलीला त्या महिलेच्या तावडीतून सुखरूप सोडवून घेतले. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित महिलेला ताब्यात घेतले. तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तिने तेथून पलायन केले. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीही हीच महिला रुग्णालयात गोंधळ घालताना दिसून आली होती. या घटनेनंतर शहरात मुलांना पळविणार्या टोळीबाबत अफवा पसरू लागल्या. मात्र संबंधित महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. गाडगेनगरचे ठाणेदार गोरखनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
अफवांनी शहरभर पसरली घबराट-अशोकनगरातील प्रकारानंतर काही वेळातच शहरभर मुलांना पळविणारी टोळी फिरत असल्याच्या चर्चा रंगल्या. अनेक भागांत पालकांनी मुलांना घराबाहेर पाठविणे टाळले. पोलिसांनी मात्र नागरिकांनी अफवांना बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.




