तिवसा नगरपंचायतच्या सेवानिवृत्त कर्मचार्यांची आत्महत्या
प्रशासनाने अन्याय केल्याचा पत्नीचा आरोप

-5 वर्षांपासून थकबाकी रोखली
तिवसा / 9 सप्टेंबर : तिवसा शहरातील नगरपंचायतमध्ये व्हॅल्मन म्हणून सेवेत असलेले व सन 2019 मध्ये सेवानिवृत्त झालेले बाबुराव महादेवराव मकेश्वर (वय 64, रा. तिवसा) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली असून या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येस नगरपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचा गंभीर आरोप मृतकाच्या पत्नी लता बाबुराव मकेश्वर यांनी केला आहे. बाबुराव मकेश्वर हे आपल्या हक्काच्या रजारोखी व पगाराच्या थकबाकीसाठी गेल्या पाच वर्षांपासून नगरपंचायतच्या पायर्या झिजवत होते, मात्र न्याय न मिळाल्याने त्यांनी अखेर टोकाचा मार्ग स्वीकारल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
बाबुराव मकेश्वर यांनी ग्रामपंचायत काळापासून शंभर रुपयांच्या दैनिक रोजंदारीवर काम सुरू केले होते. कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी वर्षभर विना मोबदला सेवा बजावली होती, असे त्यांच्या पत्नी लता मकेश्वर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, पगाराची थकबाकी आणि रजारोखीचे पैसे मिळावेत म्हणून सतत नगरपंचायतीकडे पाठपुरावा करूनही त्यांना दिलासा मिळाला नाही. या विवंचनेतूनच अखेर त्यांनी राहत्या घराच्या हॉलमध्ये खिडकीला दुपट्टा बांधून गळफास घेऊन जीवन संपविले.
या प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी व कार्यालय अधीक्षक यांच्या अहवालानुसार बाबुराव मकेश्वर यांच्या दोन जन्म दाखल्याच्या नोंदी दिसून आल्या होत्या. या दोन जन्म दाखल्यांमध्ये तफावत असल्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांनी त्यांच्यावर 40 हजार रुपयांची वसुली काढली होती, अशी माहिती विद्यमान मुख्याधिकारी शिवदास मुसळे यांनी दिली. यामुळेच त्यांच्या थकबाकी रकमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मर्ग दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अधिकार्यांकडे देण्यात आला असून नातेवाईकांचे बयान व आवश्यक चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तिवसा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल उपाध्याय यांनी दिली.
-नातेवाईकांचा रोष
या घटनेनंतर नातेवाईक व नागरिकांमध्ये नगरपंचायत प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत असून, एखादा सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या हक्काच्या पैशासाठी एवढा त्रास सहन करून शेवटी आत्महत्या करतो, ही अत्यंत संतापजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे तिवसा शहरात मोठी खळबळ उडाली असून नगरपंचायत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.




