‘तो’ भूकंप नव्हता!, जिल्हा प्रशासनाचा इन्कार

मात्र नेमक काय घडलं? याबाबत अनभिज्ञता

-शिरजगाव (मोझरी) परिसरात दहशत
-अफवांना बळी पडू नका, ग्रामस्थांना आवाहन
अमरावती / 8 सप्टेंबर : अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरजगाव (मोझरी) परिसरात रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दोनदा जमिनीत कंपने झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. काही घरांच्या भिंतींना भेगा पडल्या, तर कपाटात ठेवलेले भांडे खाली कोसळले. त्यामुळे गावकरी घराबाहेर पळाले. गेल्या वर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी अशाच प्रकारचे झटके जाणवल्याने या घटनेनंतर जुन्या आठवणी ताज्या झाल्या. परंतु जिल्हा प्रशासनाने अशा प्रकारची भूकंपीय घटना झाल्याचे नाकारले असून, कोणत्याही सिस्मोग्राफवर भूकंपाची नोंद नसल्याचे स्पष्ट केले.
गावकर्‍यांनी सकाळी सव्वादहाच्या सुमारास जमिनीतून अजब आवाज ऐकू आल्याचे सांगितले. लगेचच भूकंपासारखी हालचाल जाणवली. काही क्षणांनी ही हालचाल शांत झाल्यावर पुन्हा साडेदहाच्या सुमारास दुसरा झटका बसला. हा झटका पहिल्यापेक्षा तीव्र होता. त्यामुळे काही घरांच्या भिंतींना फट पडली आणि काही घरांतील बर्तनसामान कपाटांतून खाली पडले. घाबरलेले नागरिक घराबाहेर धावले. ही माहिती मिळताच तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखेडे, निवासी उपविभागीय अधिकारी अनिल भटकर व तहसीलदार डॉ. मयूर कलसे यांनी शिरजगाव (मोझरी) येथे जाऊन पाहणी केली. गावकर्‍यांशी चर्चा करून त्यांना धीर दिला. यासंदर्भात प्रशासनाने नोंद घेतली असून, अधिकार्‍यांनी गावाचा प्रत्यक्ष दौरा केला असता कुठलाही मोठा नुकसानीचा प्रकार आढळला नाही.
जिल्हा प्रशासनाने नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी तसेच जियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांना माहिती कळवली. अकोला व इतर ठिकाणी बसवलेल्या सिस्मोग्राफ यंत्रांवरील नोंदी तपासल्या असता कोणत्याही भूकंपाची नोंद नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा भूकंप नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तरीदेखील नेमके काय झाले याचे उत्तर मात्र प्रशासनाकडे नाही. गावकर्‍यांच्या घरांच्या भिंतींमध्ये आणि गावातील नाल्यात पडलेल्या भेगा या नक्की कशामुळे झाल्या याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
सुमारे 18 ते 20 वर्षांपूर्वी शेंदोळा बु. गावात जमिनीखालील हालचाली व अजब आवाज यामुळे दहशत निर्माण झाली होती. त्यावेळी जियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या पथकाने पाहणी करून दिलेल्या अहवालात जमिनीतल्या चुनखडीमध्ये पाणी शिरल्याने केमिकल रियॅक्शन होऊन गॅस तयार झाला, त्यामुळे आवाज व हालचाली जाणवतात, असे नमूद केले होते. शिरजगाव (मोझरी) परिसरात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पावसामुळे जमिनीत पाणी साचले असल्याने तसाच प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गत 4 जून 2025 रोजी धारणी तालुक्यातील शिवझिरी, डाबका, रेहाट्या व नारदू गावांत 3.8 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवला गेला होता. त्याआधी 30 सप्टेंबर 2024 रोजी आमझरी व टेटू गावांत 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. आता शिरजगाव (मोझरी) येथे दहा मिनिटांच्या अंतराने दोनदा जमिन हलल्याची चर्चा रंगली आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावाचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला असता कुठलाही मोठा नुकसानीचा प्रकार आढळला नाही. सिस्मोग्राफवरही भूकंपाची नोंद नाही. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये. प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे. हा प्रकार नेमका कशामुळे घडला, त्यामागचे शास्त्रीय कारण शोधण्याचे प्रयत्न सुरु आहे. त्यानंतर आवश्यक उपाययोजनाही केल्या जातील.
-डॉ. मयूर कळसे, तहसीलदार तिवसा.

संबंधित बातम्या

Back to top button