मुंबईकडे धावणार्‍या रेल्वेत मराठा आंदोलनाची लाट

फलाटांवर उसळली गर्दी, सुरक्षा यंत्रणा अलर्ट

अमरावती / 1 सप्टेंबर : मुंबईच्या दिशेने धावणार्‍या रेल्वे गाड्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अक्षरशः प्रचंड गर्दी उसळली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आधीच प्रवाशांचा ताण असताना मराठा आंदोलनासाठी मुंबईकडे निघालेल्या आंदोलकांची भर पडल्याने रेल्वे स्थानकांवर हालचाल वाढली आहे. नागपूर, अजनी, वर्धा, बडनेरा भुसावळ, नाशिकसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर रविवार दुपारपासून गर्दीची लाट ओसंडून वाहत आहे. आरक्षित डब्यांचे कोच ‘हाऊसफुल्ल’ झाले असून अनारक्षित डब्यांत शिरण्यासाठी प्रवासी आणि आंदोलक लवकरच फलाटांवर दाखल होत आहेत. फलाटावर तुडुंब गर्दी, तिकीट खिडक्यांवरील रांगा आणि गाडीत शिरण्यासाठी चढाओढ यामुळे रेल्वे प्रशासनाचा ताण वाढला आहे.
गर्दीच्या या लाटेला सामोरे जाण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलिस आणि स्थानिक पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी स्थानकांमध्ये सीसीटीव्ही मॉनिटरिंग वाढविण्यात आले असून गाड्यांच्या आत गस्त तीव्र करण्यात आली आहे. काही स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत तर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) तसेच श्वान-दल रात्रंदिवस तपासणीत गुंतले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक हालचालीवर कडक नजर ठेवली जात आहे.
गणेशोत्सवामुळे आधीच गर्दी वाढलेली असताना आंदोलनकर्त्यांनी रेल्वेत प्रवास सुरू केल्याने जीआरपी आणि आरपीएफ वरिष्ठ अधिकारी सतत स्थानकांची पाहणी करत आहेत. नागपूर आणि अजनी येथे तर आठवडाभरापासूनच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र रविवारी आंदोलकांची गर्दी वाढल्याने तो आणखी दुपटीने वाढवण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. सीसीटीव्ही, गस्त, तपासणी यंत्रणा या सर्वांकडून सातत्याने देखरेख केली जात आहे. मुंबईकडे जाणार्‍या प्रत्येक गाडीत आंदोलकांचा ओघ वाढत असून फलाटावरचा ताण हाताबाहेर जाणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गर्दीच्या या महापूरात प्रवासी आणि आंदोलक एकत्र मिसळले आहेत, तर दुसरीकडे सुरक्षा दल 24 तास सज्ज उभे राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button