तपासणीसाठी तुटकं यंत्र, बनावट रिपोर्ट
डॉक्टरांना निलंबित करा, जरांगेंची मागणी

-सरकारवर टीका, तपासणीस नकार
मुंबई / 1 सप्टेंबर : मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. तब्येत खालावूनही वैद्यकीय तपासणी नाकारत, तपासणीसाठी आलेल्या सर्व डॉक्टरांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे केली आहे.
जरांगे पाटलांचा संताप नेमका कशामुळे? तर तपासणी करणार्या पथकाकडे रक्तदाब मोजण्याचे यंत्र तुटकं व चिंध्या बांधलेले होते. एवढेच नव्हे तर काल रक्तातील साखर तपासताना डॉक्टरांच्या यंत्राने फक्त 30 दाखवले; मात्र आमच्या मशीनने 86 दाखवले, असा दावा जरांगे पाटलांनी केला. हे जर मुंबईचे डॉक्टर असतील तर माणसं कशी वाचणार? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित करत डॉक्टर पथकाला तंबूतून बाहेर काढले. सरकार मुद्दाम निकृष्ट यंत्रे घेऊन आलेल्या डॉक्टरांना पाठवत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारी यंत्रणेवर दाखवलेला अविश्वास आता तीव्र संघर्षाकडे झुकताना दिसतो आहे. एका बाजूला न्यायालयाने सरकारला कडक निर्देश दिले आहेत, तर दुसरीकडे जरांगे पाटील यांचे आंदोलन अधिक टोकाला जात आहे. तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना अपमानास्पद रीतीने हाकलून लावणे हे सरकारविरोधातील अविश्वासाचे स्पष्ट लक्षण आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा मार्ग स्वीकारला तर परिस्थिती आणखी चिघळणार हे उघड आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारला कायदेशीर पावले उचलावीच लागतील, मात्र उपोषणकर्त्यांची तब्येत आणि आंदोलनकर्त्यांचा संताप या दोन्ही आघाड्या आता एकाच वेळी हाताळणे हे सरकारसमोर मोठे आव्हान ठरले आहे.




