कटुतेचा प्रवास थांबवून राणा-अडसूळांचा सौहार्दाचा प्रयोग
गणेशोत्सवातले ‘राजकीय दर्शन’

-अमरावतीच्या राजकारणात नवा ट्विस्ट
-राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमरावती / 28 ऑगस्ट : गणेशोत्सव म्हणजे उत्सव, भेटीगाठी आणि सौहार्द. मात्र या धार्मिक भावनेच्या उत्सवात अमरावतीच्या राजकारणाला नवा राजकीय रंग मिळाल्याचे चित्र समोर आले आहे. बडनेराचे आमदार रवी राणा हे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांच्या कांदिवली (पूर्व) येथील निवासस्थानी गणेश दर्शनासाठी पोहोचले. बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्ताने कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून परिचित राणा आणि अडसूळ परिवार एकाच छताखाली आले. त्यामुळे अमरावतीतील पुढील राजकीय समीकरणांबाबत चर्चा रंगू लागली आहे.
लोकसभा निवडणुकांपासून सुरू झालेला अडसूळ-राणा संघर्ष हा मागील काही वर्षांपासून चांगलाच गाजत होता. आनंदराव अडसूळ आणि नवनित राणा यांच्यातील सामना दोनदा लोकसभा निवडणुकीत झाला. परस्परांवर झालेले आरोप-प्रत्यारोप, जात प्रमाणपत्राचा मुद्दा आणि विधानसभा निवडणुकीत दर्यापूर मतदारसंघात राणांनी अभिजित अडसूळांविरोधात उमेदवार उभा करून घेतलेली भूमिका यामुळे संबंधांमध्ये कटुता शिगेला पोहोचली होती. एवढेच नव्हे तर नवनित राणा यांनी अभिजीत अडसूळ यांच्याविरोधात प्रचार सभाही घेतल्या होत्या. त्यामुळे दोन्ही घराण्यातील वैराचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटले.
मात्र विधानसभा निवडणुकांनंतर आणि महायुतीच्या सत्तेच्या काळात राणा-अडसूळ संघर्ष हळूहळू शांत झाल्याचे चित्र दिसले. अलीकडे मोठ्या राजकीय मुद्द्यांवरून थेट संघर्ष टाळण्यात आला. अशा पार्श्वभूमीवर रवी राणा यांचा अभिजीत अडसूळ यांच्या घरी झालेला ‘बाप्पा भेटीचा’ प्रसंग महत्त्वाचा ठरतो. ही भेट केवळ गणेशोत्सवापुरती आहे की त्यातून नव्या राजकीय समीकरणांचा पाया रचला जात आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा विचार करता, राणा-अडसूळ सौहार्दपूर्ण वातावरणात दिसणे ही नवी राजकीय शक्यता मानली जात आहे. अमरावतीच्या राजकारणात कट्टर वैरी एकत्र येऊ शकतात का? महायुतीच्या व्यापक गणितासाठी या दोन घराण्यांचे संबंध सौम्य होणे अपरिहार्य आहे का? या प्रश्नांची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे. गणेशोत्सवातले हे ‘मनोमीलन’ तात्पुरते आहे की आगामी निवडणुकांसाठी रणनीतिक पाऊल आहे, हे पुढील काळात स्पष्ट होईल. पण बाप्पाच्या निमित्ताने कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र आले ही घटना राजकीय दृष्ट्या लक्षणीय ठरली आहे.




