शहानूर धरणातून विसर्ग, चारही दारे उघडलीत

पावसामुळे जलाशय पातळी वाढली

-नागरिकांना सतर्कतेचा इशारा
अमरावती / 28 ऑगस्ट : शहानूर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील जलाशय पातळीत सातत्याने वाढ होत आहे. आज गुरुवार, दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 8 वाजता धरणाची जलाशय पातळी 446.98 मीटर इतकी नोंदवली गेली असून साठ्याची टक्केवारी 84.84 टक्के इतकी झाली आहे. प्रचलन यादीप्रमाणे ऑगस्ट महिन्याअखेर पाणी पातळी 445.05 मीटर व साठा 75.11 टक्के इतका अपेक्षित असताना यंदा सरासरीपेक्षा अधिक पाणी साठा झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यमान वाढत असल्याने आज संध्याकाळी 8 वाजता धरणाचे चारही दरवाजे 20 सेंटीमीटरवरून 25 सेंटीमीटर उघडण्यात आले आहेत. याद्वारे सांडव्यातून 75.90 घनमीटर प्रति सेकंद (क्यूमेक्स) इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. परिस्थितीनुसार पुढील 24 तासात किंवा त्यापूर्वी विसर्गामध्ये वाढ अथवा घट करण्यात येऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचा आणि पुढील काही दिवसांचा अंदाज लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदीपात्रात ग्रामस्थांनी जाणे किंवा नदी ओलांडणे पूर्णतः टाळावे, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button