आरोप-प्रत्यारोपांची जुनी लढत पुन्हा पेटली
खा. वानखेडे विरुद्ध राणा दाम्पत्य

-सोशल मीडिया युद्ध, राजकारण तापले
-मेळघाट, विकास आणि जनतेच्या प्रश्नांवरून तणाव
अमरावती / 22 ऑगस्ट : लोकसभा निवडणुकीला अनेक महिने उलटले तरी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे आणि पराभूत खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यातील तणाव कमी होण्याचे नाव घेत नाही. धारणीसह जिल्ह्यातील दहीहंडी सोहळ्यांत राणा दाम्पत्याने थेट वानखेडेंवर हल्ला चढवत ‘नवे खासदार मेळघाटात दिसतच नाहीत, लोकसभेत मेळघाटचा आवाज हरवला आहे,’ असा थेट आरोप केला. ‘हा पराभव नवनीत राणांचा नाही, तर अमरावतीच्या विकासाचा आहे,’ असा आक्रमक घणाघात आमदार रवी राणांनी केला. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्याप्रमाणे पसरताच वानखेडेंनीही आक्रमक शैलीत पलटवार करत राणा दाम्पत्याला प्रत्युत्तर दिले आणि राजकीय वातावरण तापवले.
वानखेडे यांनी ‘राणा दाम्पत्य अद्याप पराभवाच्या जखमेतून सावरलेले नाही. म्हणूनच ते फेक नैरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल करत आहेत,’ असा हल्ला चढवला. दहीहंडीच्या व्यासपीठावरून आरोपांची फटकेबाजी सुरू असताना आपण मात्र पुरग्रस्त शेतकर्यांत फिरत होतो, असा प्रतिघात त्यांनी केला. ‘फिनले मिल कामगारांचे आंदोलन धगधगत असताना राणा दाम्पत्याने तोंडदेखलंही विचारलं नाही; मी मात्र कामगारांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिलो,’ असे सांगून वानखेडेंनी राणांच्या राजकीय भूमिकेवर सवालचिन्ह उभे केले. ‘त्यांना माझ्या कामाचा मागोवा लागत नसेल तर रोजचं कार्यक्रमपत्रकच त्यांना पाठवतो,’ असा उपरोधिक बाण सोडत त्यांनी वातावरण आणखी पेटवले.
विशेष म्हणजे वानखेडे यांनी उत्तर देण्याची नवी शैली वापरत राणांच्या भाषणांच्या क्लिप्ससोबत स्वतःच्या कामांच्या व्हिडिओ क्लिप्स जोडून प्रत्युत्तर दिले. मेलघाटातील माता-बालमृत्यू, वीज उपकेंद्रामुळे पन्नास गावांत आलेला उजेड, पाण्याच्या समस्यांवर घेतलेली थेट बैठक – या सर्व गोष्टी दाखवत ‘मी मैदानात आहे’ असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. एवढेच नव्हे तर आपल्या जनसंपर्क कार्यालयाचा आणि घराचा पत्ताही दाखवून ‘मी कुठे आहे, हे लोकांना माहीत आहे; शोध घेण्याची गरज फक्त राणांना आहे,’ असा टोला त्यांनी लगावला. सोशल मीडियावरून चाललेले हे ‘प्रत्युत्तरयुद्ध’ आता जिल्ह्यात चर्चेचा मुख्य विषय ठरले आहे.
-राणा दांपत्याचा घणाघात
खासदार बळवंत वानखेडे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवितांना बडनेराचे आमदार रवी राणा म्हणाले की, अमरावतीत नवे खासदार शोधले तरी सापडत नाहीत. नवनित राणा यांच्या पराभवामुळे लोकसभेत मेळघाटचा आवाज आता हरवला आहे. नवनित राणा यांचा पराभव हा पराभव व्यक्तीचा नाही, तर जिल्ह्याच्या विकासाचा पराभव आहे.
-खा. वानखेडेंचा पलटवार
राणा यांच्या टिकेला उत्तर देताना खासदार बळवंत वानखडे यांनी जोरदार पलटवार केला आहे. राणा दाम्पत्य पराभव विसरूच शकलेले नाही. ते लोकांच्या नजरेत राहण्यासाठी फक्त दिखाऊ सोहळ्यांत रमतात. मी शेतकर्यांच्या व कामगारांच्या लढ्यात मैदानात उभा आहे. आता दररोजचे कार्यक्रमपत्रकच मी राणांना पाठवतो.




