ठेकेदारांचा ठिय्या; जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी
8 महिन्यांपासून बिले थकित, संघटना संतप्त

-राज्यभर 35 जिल्ह्यांत आंदोलन
अमरावती / 19 ऑगस्ट : अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज ठेकेदार, अभियंते व विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. मागील आठ महिन्यांपासून बिलांची थकबाकी न मिळाल्याने संतप्त ठेकेदारांनी मुख्यमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले.
आंदोलकांनी ठेकेदारांच्या थकबाकीबाबत तातडीने निधी उपलब्ध करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. बिल मिळालेच पाहिजे, ठेकेदार एकता जिंदाबाद, विकासकामे तात्काळ सुरू करा अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. सादर केलेल्या निवेदनात ठेकेदारांनी स्पष्ट केले की, थकबाकीमुळे फक्त कामेच थांबलेली नाहीत, तर अभियंते, मजूर, ट्रान्सपोर्टर्स, माल पुरवठादार अशा लाखो लोकांचे रोजगार धोक्यात आले आहेत. 5-6 कोटी समाजघटकांवर याचा थेट परिणाम होत असल्याचे ठेकेदारांनी अधोरेखित केले.
अमरावतीतील या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या ठिय्यामुळे वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली. आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन यांनी केले. जिलाध्यक्ष अश्विन पवार, उपाध्यक्ष शिवचरण राठोड, सचिव प्रशांत बाजड, शहराध्यक्ष गजानन दळवी, अभियंता संघटनेचे जिलाध्यक्ष उज्वल पांडे, उपाध्यक्ष अक्षय खापरकर, सचिव राहुल सांडे, शहराध्यक्ष ऋषिराज नागरिया यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद सहभागी झाले. शुभम गिरी, वैभव गावंडे, गोपाल राठी, योगेंद्र विल्हेकर, अंकुश लोंढे, आशीष आगरकर, प्रमोद पिपळे, विवेक गिरनिकार, रविंद्र गुल्हाणे आदी अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते.




