मेळघाटातील 22 गावांमध्ये अनेक वर्षांपासून विजपुरवठा खंडित
संतप्त आदिवासींची महावितरणवर धडक

-उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन
अचलपूर / 19 ऑगस्ट : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील 22 गावांमध्ये विजेचा पुरवठा गेल्या अनेक वर्षांपासून खंडित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गावातील संतप्त आदिवासी रहिवाशांनी महावितरण अचलपूर कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले आणि याबाबत जाब विचारला. कार्यालयात मुख्य कार्यकारी अभियंता हजर नसल्यामुळे गावकर्यांनी निवेदन उपकार्यकारी अभियंता निलेश बोरिवार यांना दिले.
चिखलदरा तालुक्यातील एकताई परिसरातील हिल्डा, बोरधा, सलिता, सुमिता, कुटीदा, भांडुम, पिपळ्यू ऐकताई, सलिता, सुमिता, कुटीदा, भांडुम, टेम्भूरु, हिल्डा, बोरधा यांसह अन्य गावांतील वीज पूरवठा खंडित आहे. गावकर्यांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षांपासून विजपुरवठा बंद असल्यामुळे लोकांना अंधारात राहावे लागत आहे, मुलांचा अभ्यास, वीजेवर चालणारी उपक्रमे थांबलेली आहेत आणि दैनंदिन व्यवहारात अनेक अडचणी येत आहेत. गावकर्यांनी निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी गोरगरीब बांधवांना सरकारकडून वीजपुरवठा कधी सुरू होणार? असा प्रश्न आम्ही सातत्याने विचारत आहोत, पण त्याकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळा नाही.
निवेदनावर सही करणार्यांमध्ये सोमा बेठेकर, नंदलाल दारशिंमबे, मोतीराम कासदेकर, कज्जू धिकार, सोमाजी दारशिंम्भे, रमेश सावलकर, नितेश मावस्कर, सुरजलाल सावलकर, सुरेश दारसिम्भे, राजू मोरे, सोमा बेठेकर, सुखराम दारसिंबे, मुन्ना धिकार, विलास दारशिंदे आदींचा समावेश आहे. माजी सरपंच तोताराम कासदेकर यांनी सांगितले की, आठ वर्षांपासून विजेचा प्रस्ताव आहे, तरीही आम्ही अंधारात आहोत. आमच्या गावात आमच्या वडिलांनीही विज पाहिलेली नाही, आता आमच्या पिढीच्या नशिबातही वीज नाही, हे आमचं दुर्दैव आहे.
दरम्यान यावेळी अचलपूर येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता निलेश आर. बोरीकर यांनी सांगितले की, 22 गावांच्या वजी पूरवठ्यासंदर्भातील प्रस्ताव वन विभागाच्या अमरावती व नागपूर कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. 7 व 8 ऑगस्ट रोजी याबाबत तपासणी झाली आहे. प्रस्तावाची दखल घेण्यात आली असून लवकरच आवश्यक ती पाउले उचलली जातील.




