मुंबई-नागपूरदरम्यान सहा विशेष गाड्यांची घोषणा

रेल्वे प्रवाशांना गणरायाची भेट, कायमस्वरूपी जनरल डबे वाढणार

अमरावती / 18 ऑगस्ट : गणेशोत्सवाच्या पोर्शभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस- नागपूरदरम्यान 22 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत सहा अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार आहेत. गाडी क्रमांक 02101 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनसहून दर शुक्रवारी रात्री 00.15 वाजता सुटून नागपूरला दुसर्‍या दिवशी दुपारी 13.40 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 02102 विशेष नागपूरहून दर शुक्रवारी 14.30 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी पहाटे 5.00 वाजता मुंबईला पोहोचेल. या दोन्ही गाड्यांच्या प्रत्येकी तीन सेवा होणार आहेत. या गाड्यांना ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथ थांबे असतील. संरचनेत एक वातानुकूलित द्वितीय, सहा वातानुकूलित तृतीय, नऊ शयनयान, चार सामान्य द्वितीय आणि एक द्वितीय आसनव्यवस्था तसेच गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे. अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येणार असून सुपरफास्ट मेल/एक्सप्रेसच्या भाड्यानुसार शुल्क आकारले जाईल. दक्षिण मध्य रेल्वेने सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. नांदेड-मनमाड, पूर्णा- आदिलाबाद, आदिलाबाद-परळी, परळी-अकोला, पूर्णा-अकोला, पूर्णा-परळी आणि परळी-पूर्णा अशा गाड्यांना कायमस्वरूपी तीन अतिरिक्त जनरल डबे जोडले जाणार आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button