कर्जमाफीबाबत सरकार गंभीर; शेतकर्‍यांना दिलासा मिळणार?

मंत्री संजय राठोड यांनी दिले संकेत

यवतमाळ / 18 ऑगस्ट : महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर कर्जमाफीचे ओशासन दिले होते. मात्र, अद्याप ती मागणी पूर्ण झालेली नाही. शेतकरी संघटना आणि नेत्यांकडून सतत होत असलेल्या दबावानंतर अखेर सरकार आता या दिशेने पावले उचलत असल्याचे संकेत मिळाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे झालेल्या वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. राज्य मंत्रिमंडळात या विषयावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील, असे सुतोवाच त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, यापूर्वीच कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही कर्जमाफीबाबत संकेत दिले होते. मी स्वतः शेतकरी पुत्र आहे. शेतकर्‍यांच्या अडचणी मला ठाऊक आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील, असे ते म्हणाले होते. तर ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती देताना, योग्य शेतकर्‍यांपर्यंतच कर्जमाफी पोहोचावी यासाठी विशेष समिती नेमण्यात आली आहे, असे नमूद केले होते. राज्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button