अमरावतीत 16 मोठ्या नाल्यांच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम
पोकलेन मशीनद्वारे काम युद्धपातळीवर

अमरावती /10 एप्रिल : शहरातील नाले स्वच्छतेला गती देत अमरावती महानगरपालिकेकडून 16 प्रमुख नाल्यांच्या साफसफाईसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार ही मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत असून, नाल्यांमधील गाळ व कचरा हटवून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यावर भर देण्यात आला आहे.
या मोहिमेत भाजीबाजार परिसरातील ताजनगर, वडाळीपासून सुरू होणारा आंबानाला, महादेव खोरी परिसरातील नाला तसेच मोशी कॉलनी आणि मशानगंज येथील नाल्यांचा समावेश आहे. या सर्व नाल्यांची प्रभावी साफसफाई करून पावसाळ्यात निर्माण होणार्या पाणी तुंबण्याच्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्याचा उद्देश आहे. सध्या या कामासाठी 2 मनपाच्या आणि 4 भाड्याने आणलेल्या पोकलेन मशीन तैनात करण्यात आल्या असून, नाल्यात साचलेला गाळ, प्लास्टिक कचरा, झाडाझुडपांचे अवशेष आणि इतर अडथळे काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. विशेषतः ताजनगर नाला हा महत्त्वाचा जलवाहिनीचा भाग असल्याने त्याच्या स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबणे, रस्त्यांवर पाणी येणे, दुर्गंधी निर्माण होणे आणि आरोग्यविषयक समस्या वाढणे अशा अडचणी निर्माण होत होत्या. भाजीबाजार परिसरातील व्यापारी आणि रहिवाशांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आयुक्त वर्षा लड्डा यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिल्यानंतर प्रशासनाच्या देखरेखीखाली नियोजनबद्ध पद्धतीने नालेसफाई सुरू करण्यात आली आहे. पोकलेन मशीनच्या साहाय्याने संपूर्ण नाल्याची टप्प्याटप्प्याने साफसफाई केली जात असून, पाण्याचा प्रवाह मोकळा करण्यावर भर दिला जात आहे. काम सुरू असताना नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. तसेच काम सुरक्षित व जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील माहितीनुसार, ही मोहीम पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार्या दीर्घकालीन उपाययोजनांचा भाग असून, नालेसफाई पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणी तुंबण्याच्या समस्येत मोठ्या प्रमाणात घट होईल आणि स्वच्छता व आरोग्य स्थितीत लक्षणीय सुधारणा करणे सुरू आहे.




