संततधार पावसामुळे शेतकर्यांमध्ये उत्साह
पुढील तीन दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

*जिल्ह्यात बर्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर दमदार पाऊस
अमरावती /13 ऑगस्ट : पावसाची आतुरतेने वाट पाहणार्या विदर्भातील जवळजवळ सर्वच भागात मुसळधार पावसाने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बरेच दिवसानंतर आलेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. तसेच चारा आणि पाण्याची कमतरता देखील संपेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे, हवामान खात्याने संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता वर्तविली असून अमरावती आणि अकोलासह विभागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये 17 ऑगस्टपर्यंत पाऊस सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनानेही सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज खरा ठरला आहे. बुधवारी जिल्ह्यातील परतवाडा, अचलपूर, धारणी, चिखलदरा, अंजनगाव, दर्यापूर, मोर्शी, तिवसा या तालुक्यांमधून मुसळधार पाउस कोसळल्याची वृत्त समोर आले आहे. तसेच अमरावती शहरातही अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमिवर अग्निशमन विभागही सतर्क आहे. सकाळी सुरू झालेल्या रिमझिम पावसाचे रूपांतर दुपारपर्यंत मुसळधार पावसात झाले. त्यामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले. नियोजित कार्यक्रमांना उपस्थिती प्रभावित झाली, तर दुसरीकडे शाळा आणि कार्यालयांमध्ये उपस्थिती कमी असल्याचेही वृत्त समोर आले आहे. बरेच दिवसाच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसाने शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात येत आहे. उशिरा पेरलेल्या तूर, कापूस तसेच इतर पिकांसाठी पावस अत्यंत आवश्यक होता. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पिके सुकू लागली होती. ऑगस्टच्या 10 दिवसांत अपेक्षित पाऊस न पडल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.




