रमी भोवली, माणिकराव कोकाटेंचे कृषिमंत्रिपद गेले
खात्याचा कारभार दत्ता भरणेंकडे

मुंबई / 31 जुलै : विधानपरिषदेचे कामकाज सुरु असताना मोबाईलवर रमी खेळताना चित्रफितीत कैद झाल्याने वादग्रस्त ठरलेले माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले असून त्यांना कृषिखाते मात्र गमवावे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांच्याकडील कृषी खात्याचा कार्यभार काढून तो आपले अत्यंत विश्वासू सहकारी दत्ता भरणे यांच्याकडे सोपवला आहे. तर भरणे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचा कार्यभार कोकाटेंना दिला आहे.
सह्याद्री या शासकीय अतिथीगृहावर येथे गुरुवारी (31 जुलै) उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माणिकराव कोकाटे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत कोकाटे यांचे कृषी खाते काढण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खाते बदलाबाबतचे पत्र दिले. या पत्रानुसार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये खांदेपालटाचा निर्णय झाला. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कोकाटे यांची मोबाईलवर रमी खेळतानाची चित्रफीत व्हायरल झाली. या चित्रफितीमुळे कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.
मात्र, अजित पवार यांनी कोकाटे यांना कडक समज देऊन त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याऐवजी खाते बदलण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीची विनंती मान्य करत हा बदल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना कळविला असल्याचे समजते. कृषी खात्याची सूत्रे हाती घेतल्यापासून वादग्रस्त विधानांमुळे माणिकराव कोकाटे टीकेचे धनी ठरले होते. त्यातच सभागृहात मोबाइलवर रमी खेळण्याचा व्हिडिओ समोर आल्याने कोकाटे यांच्यासह अजित पवार गटावरही विरोधकांकडून टीका होऊ लागली. कोकाटे यांनी त्यानंतरही मुक्ताफळे उधळत स्वतःवर टीका ओढवून घेतली होती. दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना निवेदन देऊन वादग्रस्त मंत्र्यांना हटवावे, अशी मागणी केली होती. तसेच या प्रकरणानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांना वादापासून दूर राहण्याबाबत सक्त ताकीद दिली होती.
मी आणि सुनील तटकरे यांनी सांगूनही तुम्ही ऐकत नाही. याचा अर्थ तुम्हाला पक्षनेतृत्वाचाही धाक नाही, असा त्याचा अर्थ होतो. झाले ते खूप झाले. खरेतर तुमचे मंत्रिपदच काढायला हवे होते. पण आपले ज्येष्ठत्व लक्षात घेऊन आणि यापुढे आपण कुठलेही गैरवर्तन करणार नाही या अटीवर तुम्हाला तूर्त मंत्रिपदी ठेवतो. यापुढे काही चुकीचे आढळले तर मंत्रिपद काढावे लागेल, अशा कडक शब्दांत कोकाटेंना या बैठकीत सुनावण्यात आल्याचे समजते.




