वादग्रस्त उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांची बदली

गैरकारभाराचे होते अनेक आरोप

-आदिवासी व पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये आनंद
-दोन वर्षांपासून सुरु होता संघर्ष
अचलपूर / 20 जुलै : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने मोठा निर्णय घेत बदल्यांचे आदेश निर्गमित केले असून राज्यभरातील 13 उपवनसंरक्षक (आयएफएस) अधिकार्‍यांची नव्याने बदली व नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती वन परिक्षेत्रातील वादग्रस्त ठरलेले उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांचाही समावेश आहे. पाटील यांना कोल्हापूर येथे पाठविण्यात आले असून, ही बाब पर्यावरणप्रेमी आणि आदिवासी संघटनांसाठी एक मोठा विजय मानला जात आहे.
अमरावती परिक्षेत्रातील विविध समस्या, अकार्यक्षम कारभार, बोगस प्रकल्प, वृक्षतोड, अतिक्रमण आणि वन्यजीव संवर्धनातील निष्क्रियता यावर पर्यावरण संघटनांनी, आदिवासी नेत्यांनी आणि स्थानिक पत्रकारांनी दोन वर्षांहून अधिक काळ सातत्याने निवेदने, आंदोलने आणि पत्रकार परिषद घेऊन आवाज उठवला होता. आरएफओ वाल्के यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष केले, प्रलंबित फाईल्स डंप केल्या आणि केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पाडून प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न केला, असा त्यांच्यावर आरोप आहे. याबद्दल वाल्के यांच्याविरुद्धही कार्यवाहीची मागणी होत होती.
पर्यावरण संघटनांनी शासन निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, ही आमच्या लोकशाही मार्गाने चालवलेल्या संघर्षाची फलश्रुती आहे. आदिवासी पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष योगेश खानजोडे यांनी नमूद केले की, शासनाने अखेर जनतेचा आवाज ऐकला आणि चुकीच्या व्यवस्थापनाविरुद्ध योग्य पावले उचलली. वृक्षमित्र व पर्यावरण कार्यकर्ते सुरेश प्रजापती, प्यारेलाल प्रजापती, संजय डोंगरे, पत्रकार फिरोज खान, मोईन चव्हाण, संतोष भालेराव, गौतम खंडारे, राजेलाल कारले यांचेही आंदोलनात सक्रिय योगदान होते. पर्यावरण मित्र योगेश खानझोड़े व राजेलाल कारले यांना अनेक प्रलोभन देऊन तक्रार परत घेण्यासाठी आरएफओ वाल्के यांनी प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
-आरएफओ वालके कारवाईची मागणी
उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांच्या बदलीनंतर आता कार्यकर्त्यांनी आरएफओ वालके व त्यांच्या सहकारी वनपाल अधिकार्‍यांच्या कामकाजाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. अमरावती वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात निधी गैरव्यवहार झाला असून त्यासाठी वालके कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वन विभागातील या बदल्यांमुळे राज्यातील अन्य ठिकाणीही सकारात्मक परिवर्तन घडेल आणि पर्यावरण रक्षणाच्या दिशेने ठोस पावले उचलली जातील, असे पर्यावरण कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.
-अर्जुन के आर नवे उपवन संरक्षक
शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत उपवन सरंक्षक धैर्यशील पाटील यांची अमरावतीहून कोल्हापूरला बदली केली. पाटील यांनी स्वत: बदली करुन घेतल्याचीही चर्चा आहे. पाटील यांच्या जागी आता 2015 च्या बॅचचे आयएफएस अधिकारी अर्जुन के आर यांची अमरावती विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी नागपूर विभागात अर्थसंकल्प व नियोजन विभागात कार्यरत होते. नवीन उपवन सरंक्षक अर्जुन के आर यांच्या नेतृत्वात अमरावतीतील वनविकासाला गती मिळेल तसेच अवैद्य वृक्षतोड, अतिक्रमणास आळा बसेल आणि शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button