मनपाने अतिक्रमन हटविले, 6 ट्रक साहित्य जप्त
रेल्वे स्थानक, मालटेकडी परिसरात कारवाई

अमरावती / 18 जुलै: आयुक्त सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक आणि उपायुक्त प्रशासन डॉ. मेघना वासनकर यांच्या आदेशावरुन सध्या शहरातील अतिक्रमनांविरोधात महापालिकेकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. त्याआंतर्गत गुरुवारी रेल्वे स्थानक, मालटेकडी परिसर, रुख्मिणी नगर, चपरासीपूरा व आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमने जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी 6 ट्रक भरुन साहित्य मनपा पथकाने जप्त केले. या कारवाईमुळे अतिक्रमनकर्त्या व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
राजापेठ झोन क्रमाक 2 आणि पूर्व झोन क्रमांक 3 दस्तूर नगर या भागात ही अतिक्रमन निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. यावेळी रस्त्याच्या कडेला अतिक्रमन करुन लावण्यत आलेले व्यावसायिकांचे खोके, स्टॉल आदी मोठ्या प्रमाणावर साहित्य मनपाच्या पथकाने ताब्यात घेतलं. तब्बल अडिच तास ही करवाई चालली.
महापालिकेच्या अतिक्रमन विरोधी पथकाचे प्रमुख योगेश कोल्हे, श्याम चावरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. रेल्वे स्टेशन ते मालटेकडी मार्ग तसेच रुख्मिणी नगर, राजेंद्र कॉलनी, जिल्हा परिषद क्वॉर्टर, सायंस्कोर मैदान या भागातील खाद्यपदार्थांच्या गाड्या, ज्युस सेंटर, लोखंडी ठेले, दुकानाच्या बाहेर उभारलेले शेड यांना मनपाच्या पथकाने लक्ष केले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्तही होता. मनपा निरिक्षक अंसार अहमद, शहबान, पोलिस अधिकारी हिरुळकर या मोहिमेत सहभागी होते. काही व्यावसायिकांनी स्वत:च अतिक्रमन हटविणार असल्याचे सांगितले, त्यांना मुभा देण्यात आली.
काही अतिक्रमनकर्त्यांनी कारवाईला विरोध केल्याने बाचाबाचीचे प्रसंगही निर्माण झाले होते. काही व्यावसायिकांनी राजकिय नेत्यांना फोन करुन कारवाई थांबविण्यासाठी गळ घातल्याचेही समजते. मात्र मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी कोणत्याही दबावात न येता अतिक्रमन विरोधी मोहिम सुरु ठेवण्याचे आदेश दिले असल्याने पथकाने कुणाचेही एकुण घेतले नाही आणि ही कारवाई पार पाडली.




