80 फुटावरुन खाली नदीत पडला तरी युवक सुखरुप

पेढी नदीच्या पुलावरील घटना

-कठडे व पथदिवे नसल्याने अपघात
-ठिकाण बनले धोकादायक, दिरंगाईचा आरोप
अमरावती / 17 जुलै : अंधारात अंदाज न आल्याने एक युवक पुलावरुन सुमारे 80 फुट खाली नदीत पडला. केवळ दैव बलबत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. वलगाव नजीक पेढी नदीवर असलेल्या पुलावर ही घटना घडली. युवकाला अपघातात दुखापत झाली असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या पुलावर पथदिवे अणि कडेला कठडे नसल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत असून प्रशासनाच्या दिरंगाईबाबत संतापही व्यक्त करण्यात येत आहे.
हा युवक आपल्या दुचाकीने अमरावतीहून वलगावच्या दिशेने जात होता. पेढी नदीच्या पुलावर अंधार असल्याने त्याला समोरचे काहीच दिसले नाही. अंदाज न आल्याने तो दुचाकीसह थेट 80 फुट खाली पेढी नदीत जावून पडला. घटना लक्षात आल्यानंतर रस्त्याने जात असलेले अन्य वाहनचालक मदतीसाठी धावले. पोलिसांनाही सूचना देण्यात आली. काही वेळाने हा तरुण स्वत:च चालत रस्त्यावर आला. त्याला काही प्रमाणात दुखापत झाली होती. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांमधून व्यक्त होत होती.
अमरावती-वलगाव मार्गावर पेढी नदीवर असलेल्या या पुलावर अजूनही बरीच कामे झालेली नाही. पथदिव्यांच्या अभावामुळे येथे अंधाराचे साम्राज्य असते. पुलाला कठडे नसल्याने हे ठिकाण धोकादायक बनले आहे. या मार्गावरुन दर्यापूर, चांदुर बाजार, परतवाडा-अचलपूर, धारणी व पुढे मध्य प्रदेशातील वाहतूक चालते. त्यामुळे या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. पूल बांधल्यानंतर प्रकाश व्यवस्था आणि कठडे बांधण्यासंदर्भात प्रशासनाने हयगय चालविली असल्याने वाहनचालकांसाठी हे ठिकाण धोकादायक ठरले आहे. येथे केव्हाही मोठा अपघात घडून जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
युवकाच्या अपघातानंतर प्रशासनाप्रती नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. पथदिवे आणि पुलाला कठडे तर नाहीतच रात्री दिशादर्शक ठरणारे रिफ्लेक्टर व सूचना फलकही लावण्यात आलेले नाही. या पुलावर तात्काळ कठडे बांधून येथे प्रकाशाच्या व्यवस्थेसाठी पथदिवे लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button