जिवात जीव असेपर्यंत शेतकर्यांसाठी लढत राहणार
बच्चू कडूंचा बळीराजाला शब्द

-‘सातबारा कोरा’ यात्रेचा अंबोड्यात समारोप
-24 जुलैला महाराष्ट्र बंद व चक्काजाम
यवतमाळ / 14 जुलै: शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी तसेच शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कासाठी आपल्या जिवात जीव असेपर्यंत लढा देऊ, असा शब्द माजी मंत्री बच्चू कडू यांनी ‘सातबारा कोरा’ यात्रेच्या समारोप सभेत शेतक्यांना दिला. शेतक्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतमालाला हमीभाव द्यावा, पेरणी ते कापणी पर्यंतची सर्व कामे एमआरजीएस योजनेत समाविष्ट करण्यात यावी, दिव्यांगाच्या समस्या तत्काळ निकाली काढण्यात याव्या, यासह विविध मागण्यांसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी ही यात्रा काढली होती. या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून येत्या 24 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंद आणि चक्काजाम आंदोलनाची घोषणा बच्चू कडू यांनी यावेळी केली.
सोमवार, 7 जुलैपासून माजी कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमी अमरावती जिल्ह्यातील पापळ ते राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या साहेबराव करपे यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाणपर्यंत ही सातबारा कोरा पदयात्रा पार पडली. या यात्रेचा सोमवार, 14 जुलै रोजी महागाव तालुक्यातील अंबोडा येथे समारोप करण्यात आला. या वेळी उपस्थित शेतकरी व नागरिकांना संबोधित करताना बच्चू कडू म्हणाले, शेतक्यांची कर्जमाफी झाल्यावर हे आंदोलन संपले नाही तर शेतमालाला कायमस्वरूपी हमीभाव मिळेपर्यंत ही लढाई चालूच राहणार आहे.
आज राज्यातील शेतक्याची अवस्था बिकट असून ज्या रामकृष्णांच्या नावावर भाजपा सरकार सत्तेत आले त्याच राम, श्रीकृष्ण, गजानन नावाचे शेतकरी या व्यवस्थेचे बळी ठरत आहेत. 266 रुपये किंमतीचा युरिया आज 350 रुपयांना विकला जात आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण शेतक्याच्या हक्कांसाठी लढा देऊ असेही बच्चू कडू म्हणाले. यावेळी उपस्थित असलेले आमदार रोहित पाटील यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीका करून शेती, शेतकरी त्यांच्या समस्या, दुःख यांची जाणीव नसलेला माणूस राज्याचा कृषीमंत्री म्हणून विराजमान झाला ही फार मोठी शोकांतिका असल्याची खंत व्यक्त केली.
या आंदोलनाचा समारोप महागाव तालुक्यातील अंबोडा येथे आज सोमवारी झाला. बच्चू कडू यांनी या वेळी राज्य शासनाच्या कृषी आणि कर्जविषयक धोरणांवर तीव्र टीका केली. शेतकर्यांची ही लढाई मागण्यांसाठी नसून स्वाभिमानासाठी आहे. शेतकर्यांना स्वत:च्या हक्कांप्रती जागे करण्यासाठी ‘सातबारा कोरा कोरा’ ही पदयात्रा निर्णायक ठरली असून शासनाने शेतकर्यांचे प्रश्न सोडविले नाही तर भविष्यात हे शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी कडू यांनी दिला.
सातबारा कोरा यात्रेचा समारोप अंबोडा येथील एका मंगल कार्यालयात होणार होता. यावेळी विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी व दिव्यांगांनी मोठी गर्दी केली होती. पदयात्रा चिलगव्हाण येथून साहेबराव करपे व त्यांच्या परिवारातील मृत सदस्यांना आदरांजली वाहून अंबोडाकडे जात असतानाच अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी वाढल्याने समारोप सभा महामार्गावरील उड्डाणपुलावर घेण्यात आली. त्यामुळे वाहतूक जवळपास तीन तास ठप्प होऊन हा राष्ट्रीय महामार्ग बंद पडला होता.
-एकनाथ शिंदेंवर साधला निशाणा
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली इथपर्यंत ठीक होतं, पण त्यांनी पक्ष आणि चिन्ह घेऊन जायला नको होतं, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहे आणि सरकार आंधळं बनलं आहे, असा आरोप त्यांनी केला. हा लढा आता निर्णायक टप्प्यावर आला असून सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.




