41 देशांतून भारतात इंधन आयात

नवी दिल्ली/24 मार्च : मध्य पूर्वेत गेल्या तीन आठवड्यांपासून सुरु असलेल्या युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत भाषण केलं. होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या जहाजांवरील भारतीय नौदलाच्या जवानांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी मोदींनी राज्य सरकारांना साठेबाजी रोखण्याचे आदेश दिले. पश्चिम आशियात सुरु असलेल्या युद्धाला तीन आठवड्यांहून अधिक कालावधी उलटला आहे. यामुळे संपूर्ण जगात ऊर्जेचं गंभीर संकट निर्माण झालं आहे. याचे परिणाम भारतातही दिसत आहेत, असं पंतप्रधान मोदी राज्यसभेत म्हणाले. ’आखाती देशांमध्ये एक कोट्यवधि भारतीय राहतात, तिथे काम करतात. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत मोठ्या संख्येनं जहाजं अडकली आहेत. त्यातील कर्मचार्यांमध्ये बहुतांश भारतीय आहेत. हादेखील भारतासाठी चिंतेचा विषय आहे,’ असं मोदींनी म्हटलं. ’आम्ही आखाती देशांच्या सातत्यानं संपर्कात आहोत. इराण, इस्रायल आणि अमेरिकेसोबतही आपला संवाद कायम आहे. तणाव कमी करण्यासाठी, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सातत्यानं संवाद सुरु आहे. नागरिकांवर, रहिवासी वस्त्यांवर, ऊर्जा आणि वाहतुकीशी संबंधित प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांचा आम्ही निषेध केला आहे,’ असं मोदी म्हणाले.
सध्याचा काळाचा आव्हानाचा, अडचणीचा आहे. या परिस्थितीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न काळा बाजार करणार्यांकडून केला जाऊ शकतो. साठेबाजी केली जाऊ शकतो. ती रोखण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी दिले. यासाठी त्यांनी राज्य सरकारांना दोन महत्त्वाचे टास्क दिले. अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर सातत्यानं लक्ष ठेवा आणि साठेबाजीच्या तक्रारी मिळताच तातडीनं कारवाई करा, असे स्पष्ट आदेश मोदींनी दिले आहेत. संकट काळात सर्वसामान्य नागरिकांचा महागाईपासून बचाव करणं, याला प्राधान्य द्यायला हवं, असं मोदींनी म्हटलं.




