अमरावती जिल्ह्यात 48 तासांपासून संततधार
कधी रिमझीम तर कधी मुसळधार

-पावसाचा जोर आणखी वाढणार
-हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
-अतीदक्षता विभाग अलर्ट मोडवर
अमरावती / 9 जुलै: मागील 36 तासांपासून अमरावती शहर आणि जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. कधी रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस कोसळत असून, पुढील 24 तास संपूर्ण जिल्ह्याला प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अमरावतीसह संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
जुलै महिन्याचा दुसरा आठवडा आता सरतोय. मात्र अमरावती जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस अद्यापही झालेला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 34 टक्के पाऊस झाला असून, दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मागील तीन दिवसांपासून पाऊस सुरू झाला असून, हे पाणी जमिनीत मुरणार आहे. त्यामुळं हा पाऊस शेतीसाठी फायद्याचा आहे, असं जाणकारांचं मत आहे. अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण अमरावती विभागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्यानं अमरावती शहरात महापालिका आयुक्त सौम्य शर्मा यांनी सतर्कतेचा इशारा दिलाय. अतिदक्षता विभागाच्या पथकाला पुढील 24 तास अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. यासह नदीच्या काठाजवळ राहणार्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला महापालिका आयुक्तांनी दिला आहे.
पश्चिम बंगालवर चक्राकार वार्याच्या प्रभावामुळं तिथं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. ते दक्षिणेकडं झुकलेलं आहे. हे कमी दाबाचं क्षेत्र पुढील दोन-तीन दिवस छत्तीसगड, झारखंडच्या दिशेनं प्रवास करण्याची शक्यता आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओरिसा इथं कमी दाबाची स्थिती आहे. अशा परिस्थितीमुळं मागील तीन दिवसांपासून विदर्भात सर्वत्र पाऊस सुरू आहे. आणखी तीन दिवस अमरावतीसह वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीत मध्यम पावसाची शक्यता आहे, अशी माहिती श्रीशिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान शास्त्र विभाग प्रमुख प्रा. अनिल बंड यांनी दिली.
-मनापाकडून हेल्पलाइन नंबर
अमरावती शहरात मुसळधार पावसामुळं संकट परिस्थिती निर्माण झाल्यास 0721 2576426 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन महापालिका आयुक्त सौम्य शर्मा यांनी केलंय.
-अशी आहे धरणांची स्थिती
अमरावती जिल्ह्यात 564.05 दशलक्ष घनमीटर पाण्याची क्षमता असणारं सर्वात मोठं अप्पर वर्धा धरण हे 44 टक्के भरलं आहे. मध्य प्रदेशातील डोंगरावरून वाहत येणार्या पाण्यावर या धरणाचा पाणीसाठा अवलंबून आहे. सध्या मध्य प्रदेशातही मुसळधार पाऊस न झाल्यानं अप्पर वर्धा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. जिल्ह्यातील शहानूर धरण 39.55 टक्के भरलं असून, चंद्रभागा 60.39, पूर्णा 52.84, सपान 70.40, पांढरी 19.42, बोर्डी नाला या प्रकल्पात 14.04 टक्के पाणीसाठा आहे.




