मेळघाटातील घरकुल लाभार्थी 5 ब्रास वाळूपासून वंचित
घाटच उपलब्ध नसल्याने अंमलबजावणी रखडली

-नवीन वाळू धोरणाचा तात्काळ लाभ द्या
-खा. बळवंत वानखडे यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
अमरावती / 7 जुलै: राज्य शासनाने सुधारित वाळू धोरण जाहिर करुन विविध घरकुल योजनेच्या लाभार्थ्याना 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू देण्याचा निर्णय 8 एप्रिल 2025 रोजी घेतला होता. त्याची अंमलबजावणी अमरावती जिल्ह्यात सुरु झाली असली तरी मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील घरकुल लाभार्थी मात्र त्यापासून वंचित आहेत. वाळू घाट उपलब्ध नसल्याने मेळघाटात मेळघाटता ही योजना रखडली आहे. याबाबत खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मेळघाटातील दोन्ही तालुक्यातील घरकुल लाभार्थ्याना 5 ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यावेळी लेखी पत्राद्वारे केली.
अमरावती जिल्ह्यात चिखलदरा आणि धारणी तालुके वगळता 12 तालुक्यातील विविध योजनेतील घरकुल लाभार्थ्याना 9000 ब्रास रेती महसूल प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात 4 टप्यात मोफत वाळू देण्यात येणार आहे. चिखलदरा आणि धारणी तालुक्यात देखील मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार बळवंत वानखडे यांच्याकडे या भागातील घरकुल लाभार्थ्यानी केली होती. त्यानुषंगाने खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकारी यांना यांना लेखी पत्राद्वारे या दोन्ही तालुक्यातील घरकुल लाभार्थ्याना मोफत पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
धारणी तसेच चिखलदरा तालुक्यात वाळूचे घाट उपलब्ध नसल्याने लगतच्या तालुक्यातून मोफत वाळू देणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप उपस्थित होते. यासोबतच स्थानिक वापर व घरकुलासाठी सहज व सुलभतेने वाळू उपलब्ध करणे, तसेच पारंपारिक व्यवसाय करणार्या स्थानिक व्यक्तींना हातपाटी-डुबी पद्धतीने विनालिलाव पद्धतीचा वापर करुन वाळूगट उपलब्ध करुन देणे, खाजगी शेतजमिनीमध्ये नैसर्गिक कारणामुळे अथवा इतर कारणामुळे जमा झालेली वाळू निष्कासन करावे व शेतजमीन लागवडीयोग्य करावी, नैसर्गिक वाळूचे पर्यावरणीय महत्त्व, नैसर्गिक वाळूचा तुडवडा या बाबी विचारात घेऊन कोणत्याही कॉक्रीटच्या बांधकामामध्ये कृत्रिम वाळूच्या वापरास प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त कृत्रिम वाळूचा वापर करण्यात यावा, आदी मागण्याही खा. बळवंत वानखडे यांनी केल्या.




