कंत्राटी कर्मचार्‍यांचा मुंबईच्या आझाद मैदानावर ठिय्या

5 महिन्यापासून वेतन न मिळाल्याने कर्मचारी आक्रमक, आता माघार नाही कृती समितीचा वज्रनिर्धार

अमरावती / 10 फेब्रुवारी – गेल्या पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनच्या कंत्राटी कर्मचार्‍यांनी आता थेट सरकारविरोधात शड्डू ठोकला आहे.
सण-उत्सव अंधारात घालवल्यानंतर, प्रलंबित मानधनासाठी आणि हक्काच्या नोकरीसाठी अमरावतीतील हे कर्मचारी 9 फेब्रुवारी रोजी मुंबईत धडकणार आहेत. तब्बल 10 वर्षे सेवा देणार्‍यांना सेवेत कायम करण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने, 4 फेब्रुवारीपासून सुरू झालेले कामबंद आंदोलन आता अधिक तीव्र करण्यात आले आहे. जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नसल्याची स्पष्ट गर्जना कर्मचारी कृती समितीने केली आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागांतर्गत ग्रामीण भागात सेवा देणार्‍या या कर्मचार्‍यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. मागील पाच महिन्यांपासून त्यांना मानधनाचा एक रुपयाही मिळालेला नाही, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, ज्या कर्मचार्‍यांनी दशकभर आपली सेवा प्रामाणिकपणे बजावली आहे, त्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तरीही शासन दरबारी या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने कर्मचार्‍यांमध्ये मोठा असंतोष आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर आता बेमुदत हल्लाबोल आंदोलन छेडले जाणार आहे. प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतेचे काम विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button