शिक्षणातूनच गवसणार माणसाला खरा आत्मसन्मान

संविधानाचे रक्षण हीच बाबासाहेबांना आदरांजली

विद्यापीठात ज्ञानसाधनेसाठी 18 तास अभ्यास

अमरावती/8एप्रिल: केवळ पदव्यांचे गठ्ठा मिळवणे म्हणजे शिक्षण नसून, आपल्या विचारांना गुलामगिरीतून मुक्त करून आत्म्याला स्वतंत्र करणे हेच खरे शिक्षण आहे.
शिक्षणाच्या याच बळावर माणसाला खर्‍या अर्थाने आत्मसन्मान प्राप्त होतो, असे रोखठोक प्रतिपादन अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित ’समता सप्ताहाच्या’ उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.महाराष्ट्र ही शिवराय, फुले, आंबेडकर आणि गाडगे बाबांसारख्या महापुरुषांची कर्मभूमी आहे. या थोर पुरुषांनी स्वतःच्या सुखाचा त्याग करून समाजासाठी आपले आयुष्य चंदनासारखे झिजवले, हाच वारसा नव्या पिढीने पुढे नेणे गरजेचे आहे. राष्ट्र उभारणीत बाबासाहेबांचे योगदान अतुलनीय असून त्यांनी 1934 च्या कायद्याद्वारे भारतीय रिझर्व्ह बँकेचा पाया रचला. चवदार तळ्याचा सत्याग्रह असो वा काळाराम मंदिराची लढाई, हे केवळ पाण्यासाठी नसून माणसाला माणूस म्हणून उभे करण्यासाठी दिलेले लढे होते. संविधानातील कलम 32 हा लोकशाहीचा आत्मा असून, सामान्य माणसाला सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्याय मागण्याचा अधिकार बाबासाहेबांमुळेच मिळाला आहे. स्त्री-पुरुषांना समान हक्क आणि कामगारांच्या श्रमाचे तास निश्चित करून त्यांनी देशाच्या प्रगतीला दिशा दिली. म्हणूनच, केवळ उत्सव साजरे न करता त्यांच्या विचारांची मूल्यांची पेरणी स्वतःच्या आयुष्यात करणे हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या सोहळ्याला कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, डॉ. आर. डी. सिकची, डॉ. पुरण मेश्राम, डॉ. नितीन कोळी, डॉ. के. बी. नायक, डॉ. संतोष बनसोड, डॉ. अनिल नाईक, डॉ. अनिता पाटील, शशिकांत रोडगे, मंगेश वरखेडे, राहुल नरवाडे, मोनाली तोटे पाटील, डॉ. विलास नांदुरकर, डॉ. स्मिता थोरात, डॉ. विशाल बाप्ते, डॉ. गजानन मुळे, प्रा. सुजाता तायडे आणि ड. अरुण रौराळे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button