सहा सत्रात उत्तीर्ण विद्यार्थीनीचा प्रवेशच रद्द केला
विद्यापीठाचा निर्णय कोर्टाने चुकीचा ठरविला

-पदवी प्रमाणपत्र देण्याचे आदेश
अमरावती / 6 जुलै: बी.एस्सी कॅम्प्युटर सायन्स पदवीच्या अभ्यासक्रमात प्रवेेश घेतल्यानंतर तब्बल सहा सेमीस्टर उत्तीर्ण करणार्या विद्यार्थिनीचा प्रवेश रद्द करण्याचा निर्णय महाविद्यालयाने घेतला. बी.एस्सी कॅम्प्युटर सायन्स शाखेसाठी बारावीत गणित विषय अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले. मात्र, विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महाविद्यालयाला आदेश देऊन विद्यार्थिनीला पदवी प्रमाणपत्र बहाल करण्याचे आदेश दिले. याचिकेवर न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
कु. आदिबा सुजा रिझवी (22, रा. अकोला ) असे याचिकाकर्त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. आदिबा हिने अकोला येथील शिवाजी आर्ट, कॉमर्स व सायन्स कॉलेजमध्ये बी.एस्सी. कॅम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता. बी.एस्सी. कॅम्प्युटर सायन्स पदवीला प्रवेश करायचा असल्यात बाराव्या वर्गात गणित हा विषय अनिवार्य असतो. जर गणित विषय घेतला नसेल तर बी.एस्सी. कॅम्प्युटर सायन्सला अॅडमिशन देता येत नाही. मात्र,शिवाजी आर्ट, कॉमर्स व सायन्स कॉलेजने आदिबा हिला प्रवेश दिला. अदिबाने 2021, 2022, 2023,2024 या शैक्षणिक वर्षात पाच सेमिस्टरमध्ये आदिबा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. त्यानंतर तिने सहाव्या सेमिस्टरची परीक्षा दिल्यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने तिचा निकाल रोखून ठेवला.
आदिबाने शिवाजी महाविद्यालयाला याबाबत विचारणा करणारे पत्र 18 जुलै 2024 रोजी लिहिले. तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला 21 ऑगस्ट 2025 रोजी पत्र लिहून विचारणा केली. परंतु, विद्यापीठ आणि कॉलेजने एकमेकांना कळवले नसल्याचा दावा केला आहे. आदिबाने लिहिलेल्या पत्रावर विद्यापीठ व कॉलेजने कोणतेही उत्तर दिले नाही. दोन्ही बाजू ऐकून उच्च न्यायालयाने आदिबाला तत्काळ बीएस्सी, कॉम्प्युटर सायन्सची डिग्री देण्याचे आदेश अमरावती विद्यापीठाला दिलेत. आदिबा तर्फे अॅड. विलास डोंगरे, अॅड. राजू कडू यांनी बाजू मांडली.
बाराव्या वर्गात विद्यार्थिनीने गणित विषय घेतला नव्हता, तर बीएस्सी, कॉम्प्युटर सायन्सची डिग्रीला प्रवेश दिलाच कसा? अशी विचारणा न्यायालयाने केली. या प्रकरणात पूर्ण चूक ही सर्व विद्यापीठासह कॉलेजची असून यात विद्यार्थिनीला नाहक त्रास देण्यात आला आहे. परंतु, आदिबा ही डिग्री मिळविण्यास पात्र आहे. हे प्रकरण फसवणुकीचे नाही. आदिबाने पाच सेमिस्टपर्यंत परीक्षा दिली आणि ती तिच्या मेहनतीने उत्तीर्णही झाली. अशा परीस्थितीमध्ये तिची अॅडमिशन रद्द करणे योग्य नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.




