मंगलधामच्या जुगार अड्ड्यावर धाड
रवीनगरच्या पंक्याचा डाव गुन्हे शाखा पोलिसांनी उधळला

9 जुगारी अटकेत; सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अमरावती /26 फेब्रुवारी : शहरातील शांत समजल्या जाणार्या न्यू कॉलनीतील मंगळधाम परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने गुरुवारी दुपारी जोरदार धाड टाकली. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या भूषण हिरुरकरच्या घरात रवीनगरचा कुख्यात पंकज ठाकरे हा पत्त्यांचा डाव मांडून बसला असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून नऊ जणांना रंगेहात बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलिसांनी 6 दुचाकी, 7 भ्रमणध्वनी आणि रोख रकमेसह एकूण 5 लाख 93 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखेचे पथक 26 फेब्रुवारी रोजी परिसरात गस्त घालत असताना, त्यांना एका खबर्याकडून अतिशय गोपनीय माहिती मिळाली. मंगळधाममधील भूषण हिरुरकरच्या बंद दाराआड पैशांची मोठी हारजीत सुरू असल्याची ती माहिती होती. खात्री पटताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या घरावर छापा टाकला. आत शिरताच पोलिसांना जुगाराचा मोठा डाव मांडलेला दिसला. रवीनगरचा पंकज ठाकरे हा सर्वांकडून जुगार खेळवून घेत होता. पोलिसांनी चहुबाजूंनी वेढा घातल्याने जुगारांना पळ काढण्याची साधी संधीही मिळाली नाही. घटनास्थळावरून 58 हजार 500 रुपये रोख, 1 लाख 15 हजार रुपये किमतीचे भ्रमणध्वनी आणि 4 लाख 20 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. या सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 4 आणि 5 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जात आहेत.
या कारवाईत पोलिसांनी भूषण बबनराव हिरुडकर (वय 57 वर्ष, रा. न्यू कॉलनी मंगळधाम), निलेश बाळासाहेब गाडे (वय 40 वर्ष, रा. पुंडलिक बाबा नगर), गौरव शिवाजीराव ठाकूर (वय 27 वर्ष, रा. पार्वती नगर), राहुल अरुण भाखडे (वय 35 वर्ष, रा. बुधवारा), अनिकेत शरदराव खांडेकर (वय 31 वर्ष, रा. हनुमान नगर), अल्केश विष्णू अवझाडे (वय 26 वर्ष, रा. रवी नगर), अभिजीत सुरेशराव गावंडे (वय 35 वर्ष, रा. खोलापुरी गेट), विजय रंगराव तायडे (वय 38 वर्ष, रा. आशियाड कॉलनी) आणि निलेश बाबाराव जुनघरे (वय 44 वर्ष, रा. हर्षराज कॉलनी) या नऊ जणांना अटक केली आहे. तर पंकज ठाकरे हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.




