महाबीजच्या कार्याचा प्रत्येक बांधावर विस्तार करा
कृषी सचिव परिमल सिंह यांचे निर्देश, महाबीज मुख्यालयात कामकाजाचा आढावा

अकोला /27 नोव्हेंबर: बदलत्या हवामानाच्या आव्हानात्मक परिस्थितीत शेतकर्यांना अधिक अनुकूल, उत्पादनक्षम आणि गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. शेतकर्यांच्या आर्थिक समृद्धीमध्ये महाबीजची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून, महाबीजने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करीत आपल्या कार्याचा विस्तार राज्यातील प्रत्येक शेतकर्याच्या बांधापर्यंत करावा, असे प्रतिपादन राज्याचे कृषी सचिव तथा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे अध्यक्ष परिमल सिंह यांनी केले.
अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, संचालक डॉ. रणजीत सपकाळ तसेच विविध विभागांचे महाव्यवस्थापक उपस्थित होते. परिमल सिंह म्हणाले की, शेतकर्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेल्या निविष्ठा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाबीजने डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करावा. महाबीजद्वारे उत्पादित प्रमाणित व सुधारित बियाणे, जैविक खते, जैविक बुरशीनाशके तसेच सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त विविध कृषी निविष्ठा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. शेतकर्यांना आवश्यक कृषी निविष्ठा एका क्लिकवर उपलब्ध होतील, अशी सुलभ डिजिटल विक्री व्यवस्था विकसित करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.





