भूमि अभिलेख विभागाच्या 20 सेवांचे सुसूत्रीकरण

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

जलद कामकाजासाठी सहा प्रमुख सेवांमध्ये रूपांतर

मुंबई /26 नोव्हेंबर : राज्यातल्या जनतेची जमीन आणि मालमत्तेशी निगडित कामं झटपट, स्पष्ट आणि सोपी व्हावीत, यासाठी भूमि अभिलेख विभागाच्या कामाची पद्धत बदलून ती अधिक सुटसुटीत करण्यात आली आहे. आधीच्या 20 सेवांपैकी काही सेवा एकत्र केल्या आहेत, गरज नसलेल्या काही सेवा बंद केल्या आहेत आणि एका नव्या सेवेची भर घालून एकूण 6 मुख्य सेवा तयार केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.नियोजन विभागाच्या नियमांप्रमाणे आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मंजुरीनंतर महसूल विभागाने आदेश काढला. यानुसार नागरिकांसाठी, सरकारी विभागांसाठी आणि व्यापार्‍यांसाठी असलेल्या या 6 मुख्य सेवा ऑनलाइन पोर्टल, ’आपले सरकार’ आणि ’मैत्री’ पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
ज्या जुन्या नोंदी किंवा कागदपत्रांचं स्कॅनिंग आणि संगणकीकरण होऊन ती आधीच ऑनलाइन दिसतात, अशा कागदपत्रांच्या प्रती देणार्‍या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये मिळकत पत्रिका, मुंबई उपनगर मिळकत पत्रिका, टिपण, क्षेत्रबुक, प्रतिबुक, शेतपुस्तक, जबाब, फाळणी, आकारबंद, गटनकाशा, मोजणी नकाशा आणि अपील निकालाच्या नकला यांसारख्या सेवांचा समावेश आहे.
तसंच नेहमीची आणि घाईची मोजणी, वेगवेगळ्या प्रकारची आकारफोड, कमी-जास्त पत्रकाला मंजुरी, सगळ्या प्रकारच्या फेरफार नोंदी, मिळकतभाग पाडणं आणि भूसंपादनाची स्वतंत्र मिळकत पत्रिका यांसारख्या सारख्याच कामांच्या सेवा एकत्र केल्या आहेत. याशिवाय, जे मूळ कागदपत्र किंवा नकाशे अजून ऑनलाइन नाहीत, त्यांचं स्कॅनिंग आणि माहिती भरून ती ’ई-महाभूमी’ पोर्टलवर टाकण्याची नवी सेवा सुरू केली आहे.
तक्रार आणि अंमलबजावणी कशी होणार? -या कामांबाबत काही तक्रार किंवा अपील करायचं असेल, तर पहिल्या अपीलासाठी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख किंवा उप अधीक्षक भूमि अभिलेख / नगर भूमापन अधिकारी असतील. दुसर्‍या अपीलासाठी उपसंचालक भूमि अभिलेख यांच्याकडे जाता येईल. हा निर्णय व्यवस्थित राबवण्यासाठीचे नियम आणि तांत्रिक सूचना जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख (पुणे) देतील. तर ऑनलाइन व्यवस्था तयार करून ती जोडण्याचं काम भूमि अभिलेख विभाग आणि ’महाआयटी’ करतील.
नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात मिळाव्यात, यासाठी आम्ही काम करत आहोत. भूमि अभिलेख विभागाच्या 20 सेवांचे सुसूत्रीकरण करून 6 प्रमुख सेवांमध्ये रूपांतर केल्यामुळे अनावश्यक कागदपत्रे, फेर्‍या आणि मंजुरीचे टप्पे कमी होतील तसेच सर्व सेवा कालबद्ध पद्धतीने उपलब्ध होतील.

7 कोटी फ्लॅटधारकांना मिळणार ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’

मुंबई- राज्यातील प्रत्येक सदनिकेची स्वतंत्र मालमत्ता पत्रिका तयार करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या व्यवस्थेमुळे सदनिकेचे क्षेत्रफळ, मालकी हक्क, त्यावरील बोजे आणि कायदेशीर अडचणींची नोंद स्वतंत्रपणे उपलब्ध होणार आहे. राज्यातील सुमारे सात कोटी सदनिकाधारकांना या उपक्रमाचा लाभ होणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिली. या व्यवस्थेसाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मध्ये सुधारणा करण्यात येणार असून, नियमावलीचा मसुदा 26 नोव्हेंबरपासून हरकती आणि सूचनांसाठी खुला करण्यात येणार आहे. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, ग्रामीण भागात जमिनीच्या हक्कांची नोंद सातबारा उतार्‍यात, तर शहरी भूमापन क्षेत्रात मालमत्ता पत्रिकेत केली जाते.

सहा सेवांमध्ये खालील सेवांचा समावेश

सगळ्या प्रकारची जमीन मोजणी (काम पूर्ण झाल्यावर मोजणी नकाशाची
’क’ प्रत देणं)
* आकारफोड / कमी-जास्त पत्रक तयार करणं आणि नकाशात दुरुस्ती करणं
* सगळ्या प्रकारच्या फेरफार नोंदी
* ऑनलाइन नसलेले नकाशे किंवा जुने कागदपत्र उपलब्ध करून देणं
* मिळकत पत्रिकेचे भाग पाडून स्वतंत्र मिळकत पत्रिका तयार करणं
* भूसंपादनामध्ये रस्ता, रस्ता सेट बॅक आणि आरक्षित जागेसाठी स्वतंत्र
मिळकत पत्रिका तयार करणं

Back to top button