गोळीबारानंतर कोयत्याने दोन्ही हात छाटले
पुण्यात कोर्टाबाहेरच जीवघेणा हल्ला

हल्लेखोर 6 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पुणे/25 नोव्हेंबर -पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर बुधवारी दुपारी घडलेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या मंदार किवळे याच्यावर 6 ते 7 हल्लेखोरांनी आधी गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार करत प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र, पुणे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी दोघांचा हल्ल्यात थेट सहभाग असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. दरम्यान, या हल्ल्यामागे 2025 मध्ये पुण्यातील कात्रज परिसरात झालेल्या शुभम सुभाष चव्हाण याच्या हत्येचा बदला असल्याचे तपासात समोर आले आहे. शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मंदार किवळे हा अवघ्या चार दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर त्याच्यावर न्यायालयाबाहेर हल्ला करण्यात आला. त्यामुळे जुन्या हत्येच्या वादातूनच हा प्रकार घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 8 ते 10 तपास पथके तयार केली असून, गुन्हे शाखेच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे. हल्ल्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठीही पोलिसांची पथके काम करत आहेत. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मंदार किवळे याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. तसेच न्यायालय परिसरातील सुरक्षेचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेवरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून हल्ल्यामागील संपूर्ण कट उघड करण्याचे आव्हान आता पुणे पोलिसांसमोर आहे.
गोळीबार आणि पाठलाग करून कोयत्याचे वार
दुपारच्या सुमारास 6 ते 7 जणांच्या टोळीने कोर्ट परिसरात फिल्डिंग लावली होती. एका हल्लेखोराने पिस्तूल काढून गोळीबार केला, तर इतरांनी हातात कोयते घेतले. गोळीबारानंतर मंदार किवळे जीव वाचवण्यासाठी पळू लागला असता 3 हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला. त्याने डोक्याला हात लावून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर आणि हातांवर कोयत्याने सपासप वार केले, ज्यात त्याचे दोन्ही हात तुटून लोंबकळले.





