3.53 लाख मतदारांची पुन्हा पडताळणी

मतदारांना 30 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा संधी

आठ विधानसभा क्षेत्रांत बीएलओंची मोहीम

अमरावती /22 नोव्हेंबर- मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेत विविध कारणांमुळे नोंदणी प्रक्रिया पूर्ण न करू शकलेल्या 3 लाख 53 हजार 297 मतदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. यामध्ये अनुपस्थित, कायमस्वरूपी स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंद असलेल्या मतदारांचा समावेश आहे. या सर्व मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी बूथस्तरीय अधिकारी पुन्हा संपर्क साधणार असून, संबंधितांना 30 नोव्हेंबरपर्यंत गणना अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने मोहिमेची मुदत वाढविल्याने ही प्रक्रिया राबविली जात आहे.
विशेष सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात अनेक मतदारांचे गणना अर्ज विविध कारणांमुळे जमा होऊ शकले नव्हते. त्यामुळे अशा मतदारांना पुन्हा प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बूथस्तरीय अधिकारी संबंधित भागात जाऊन मतदारांशी संपर्क साधतील आणि अर्ज भरण्यास मदत करतील. धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर आणि मोर्शी या आठ विधानसभा मतदारसंघांत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या 17 नोव्हेंबरच्या सुधारित सूचनांनुसार गणना अर्ज तयार करणे, वाटप करणे, जमा करणे आणि त्यावर पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि संबंधित तहसीलदारांकडे राहणार आहे. बूथस्तरीय अधिकारीही आपापल्या मतदान केंद्रांच्या क्षेत्रात जाऊन मतदारांची पडताळणी करतील. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी संबंधित मतदारांना नावासह इतर तपशील तपासून अर्ज भरून देण्याचे आवाहन केले आहे. पात्र मतदारांनी मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

Back to top button