दुष्काळ संघर्ष यात्रेमध्ये वरुडच्या अजिंक्य देशमुख यांचा सहभाग
संत्रा, सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या न्याय्य हक्कांसाठी

वरुड /20 नोव्हेंबर – तालुक्यातील संत्रा, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आज आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. उत्पादन खर्च गगनाला भिडला, दुष्काळाच्या सावटान शेती उध्वस्त केली आणि बाजारपेठेत शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकर्यांच्या हातात काहीच उरत नाही. एकीकडे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला जात असताना दुसरीकडे शासनाकडून केवळ आश्वासनांची खैरात सुरू आहे. आता मात्र शेतकर्यांच्या प्रश्नांवर केवळ चर्चा नव्हे तर आरपारची लढाई लढण्याची भूमिका वरुड तालुक्यातून पुढे येत आहे.
याच पार्श्वभूमीवर वरुड तालुक्यातील शेतकर्यांच्या न्याय्य हक्कांसाठी अजिंक्य देशमुख मैदानात उतरले असून त्यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या दुष्काळ संघर्ष यात्रेत सहभागी होऊन वरुड तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी वरुड तालुक्यातील संत्रा, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकर्यांच्या ज्वलंत प्रश्नांना संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शासन दरबारी पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. संत्रा उत्पादकांना 7 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळालाच पाहिजे, सोयाबीनला 12 हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा, कापसाला 15 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी अजिंक्य देशमुख यांनी स्पष्ट भुमिका मांडली की, शेतकर्यांच्या घामाला योग्य दाम मिळणे ही शासनाची मेहरबानी नसून शेतकर्यांचा अधिकार आहे. शेतकर्यांना केवळ कर्जमाफी, मदत आणि पॅकेजच्या घोषणांमध्ये गुंतवून ठेवता येणार नाही. संत्रा, सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. वरुड तालुक्यातील शेतकर्यांचे प्रश्न शासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने ठोस निर्णय घ्यावेत अन्यथा शेतकर्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी वरुड तालुक्यातही व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही अजिंक्य देशमुख यांनी दिला.





