साहाय्यक आयुक्तांना नगरसेवनकांची मारहाण

अमरावती मनपाच्या झोन कार्यालयात उडाली खळबळ

मंगल कार्यालय सील केल्याच्या वादातून संताप
नगरसेवक संजय गव्हाळे व सोम सोळंकेवर गुन्हा दाखल

अमरावती /20 नोव्हेंबर – अमरावती महापालिकेच्या दस्तूर नगर येथील प्रभाग क्रमांक 3 कार्यालयात थकीत मालमत्ता करावरून सील केलेल्या राजमहाल मंगल कार्यालयाच्या वादातून मोठा राडा झाला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक संजय गव्हाळे आणि त्यांचे कार्यकर्ते सोम सोळंके यांनी उपअभियंता तथा सहाय्यक आयुक्त नितीन महादेवराव बोबडे यांना अश्लील शिवीगाळ करत त्यांच्या दिशेने लेखन साहित्य भिरकावले आणि सरकारी कामात अडथळा आणला. या हल्ल्यात मध्यस्थी करणार्‍या शिपाई सुरेश बंसोड यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली असून फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे अधिकार्‍यांनीच अरेरावीची भाषा वापरून अपमान केल्याचा आरोप करत नगरसेवक गव्हाळे यांनी आयुक्तांकडे निलंबनाची मागणी केली आहे.
दस्तूर नगर येथील महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 कार्यालयाकडून सध्या थकीत मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम राबवली जात आहे. औद्योगिक वसाहत मार्गावर असलेल्या राजमहाल मंगल कार्यालयाकडे मागील 3 वर्षांपासून तब्बल 13 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकीत होता. वारंवार सूचना देऊनही कर भरणा न झाल्याने प्रशासनाने 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी नियमानुसार या मंगल कार्यालयाला सील ठोकले होते. या कारवाईचा जाब विचारण्यासाठी आणि एका पत्राची पोचपावती घेण्यासाठी नगरसेवक संजय गव्हाळे हे कार्यकर्ते सोम सोळंके यांच्यासह 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी कार्यालयात पोहोचले. यावेळी दालनात प्रभाग सभापती तथा नगरसेवक इस्माईलभाई लालुवाले, नगरसेवक सचिन वैद्य, क्षेत्रीय अधिकारी प्रविण ठाकरे, सहाय्यक अभियंता आनंद जोशी, विवेक देशमुख, प्रचालक कुणाल बोडे, दिपक ससले, डोंगरे, आकाश चौधरी, राज देऊळे हे उपस्थित होते.
सहाय्यक आयुक्त नितीन महादेवराव बोबडे यांच्याशी चर्चा सुरू असताना मंगल कार्यालयाला सील का लावले यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. आम्ही शासकीय नियमानुसारच कारवाई केली असल्याचे बोबडे यांनी सांगताच नगरसेवक गव्हाळे यांचा संताप अनावर झाला. त्यांनी बोबडे यांना अत्यंत खालच्या पातळीवर जात अश्लील भाषेत शिवीगाळ सुरू केली. त्यांच्यासोबत असलेल्या सोम सोळंके यानेही अधिकार्‍यांना मारहाणीची धमकी देत शिवीगाळ केली. रागाच्या भरात सोळंके याने टेबलावर ठेवलेला लिहिण्याचा तंतुमय स्टँड उचलून थेट बोबडे यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. मात्र बोबडे यांनी डाव्या हाताने हा वार अडवल्याने मोठा अनर्थ टळला.
हा प्रकार सुरू असतानाच कार्यालयातील शिपाई सुरेश बंसोड हे आपल्या साहेबांना वाचवण्यासाठी धावून आले. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता संजय गव्हाळे आणि सोम सोळंके यांनी बंसोड यांनाही अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या झटापटीत बंसोड यांना दुखापत झाली असून आरोपींनी दालनातील महत्त्वाची शासकीय कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून देत साहित्याची नासधूस केली. कार्यालयात सुरक्षेसाठी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात हा सर्व थरार कैद झाला आहे. या घटनेनंतर महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्गात संतापाची लाट उसळली असून बोबडे यांनी तात्काळ फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी रात्री 7 वाजून 32 मिनिटांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 121, 221, 324(4), 296 आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दुसरीकडे नगरसेवक संजय गव्हाळे यांनीही महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार देत अधिकार्‍यांवर गंभीर आरोप केले आहेत. पत्राची पोचपावती घेण्यासाठी गेलो असता सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांनी तुमच्याने जे होते ते करून घ्या अशी अरेरावीची भाषा वापरून लोकप्रतिनिधींचा अपमान केला. त्यामुळे संबंधित अधिकार्‍याची सखोल चौकशी करून तात्काळ निलंबन करावे अशी मागणी गव्हाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या घटनेमुळे शहरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून कर्मचार्‍यांनी कर वसुलीसाठी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे.

अरेरावी करणार्‍या अधिकार्‍याला ‘शिवसेना स्टाईल’ने धडा शिकवला

एका कामानिमित्त मी झोन सभापती लालू वाले यांच्याकडे गेलो होतो आणि तिथे त्यांना एक पत्र दिले. पत्र दिल्यानंतर आम्ही त्यांच्या चेंबरमध्ये बसलो असताना आमच्यात थोडी चर्चा झाली. त्या चर्चेदरम्यान माझा एक सहकारी ते पत्र घेऊन झोन सहाय्यक आयुक्तांकडे गेला आणि त्यांना ते पत्र देऊन परत आला.
यादरम्यान, सहाय्यक आयुक्तांनी माझे सहकारी लालू वाले यांना विचारले की, हा कोण आहे? त्यावर त्यांनी सांगितले की, हे शिवसेनेचे नगरसेवक संजूभाऊ गव्हाळे यांचे सहकारी आहेत. हे ऐकताच झोन सहाय्यक आयुक्तांनी अरेरावीची भाषा वापरत म्हटले की, आता हा सुद्धा आपल्या प्रभागात लुडबुड करणार आहे काय? हे नेहमी-नेहमी कोणालाही त्रास देतात.माझे सहकारी लालू वाले यांनी हा सर्व प्रकार मला सांगितला. याचा जाब विचारण्यासाठी मी स्वतः त्या अधिकार्‍याच्या चेंबरमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांची बोलण्याची भाषा एका अधिकार्‍याला शोभणारी नव्हती; त्यांच्या बोलण्यात कमालीचा उद्धटपणा (टिट्यूड) होता आणि मला ही गोष्ट खटकली. माझ्या सहकार्‍यांनाही त्यांचा हा स्वभाव खटकल्याने तिथे आमची शाब्दिक बाचाबाची (हुज्जतबाजी) झाली. मी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, तुम्ही एक जबाबदार अधिकारी आहात, त्यामुळे तुमचे असे बोलणे अजिबात योग्य नाही.त्यांच्या बोलण्यात प्रचंड मग्रुरी होती आणि यापूर्वीही त्यांच्या अशाच वागणुकीबद्दल नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यांची ही अत्यंत मग्रुरीची भाषा पाहून, मी त्यांना शिवराळ भाषेत आणि ’शिवसेना स्टाईल’ने चांगलाच धडा शिकवला.
संजय गव्हाळे
शिवसेना नगरसेवक, मनपा अमरावती

सरकारी कामात अडथळा आणून मारहाणीचा आरोप
औद्योगिक वसाहत मार्गावरील राजमहाल मंगल कार्यालयाकडे मागील 3 वर्षांपासून 13 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकीत होता. नियमानुसार आम्ही त्या मालमत्तेला कुलूप लावले होते. या कारवाईचा जाब विचारण्यासाठी आलेल्या नगरसेवक संजय गव्हाळे यांनी कार्यालयात गोंधळ घालत टेबलावरील लेखन साहित्य माझ्या डोक्यावर मारले व महत्त्वाची कागदपत्रे फेकून देत सरकारी कामात अडथळा आणला.
नितीन बोबडे,
सहाय्यक आयुक्त मनपा

Back to top button