अवैध सावकारीचा प्रकार उघडकीस येऊनही कारवाई रखडली
सावकाराच्या घरातून 32 आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

चौकशी अहवालात अवैध सावकारी स्पष्ट तरी कारवाईला विलंब
अमरावती/19 नोव्हेंबर: शेतकर्याच्या तक्रारीवरून अचलपूरमधील एका सावकाराच्या घरावर आणि दुकानावर छापा टाकून 32 आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली. चौकशीत संबंधित व्यक्ती अवैध सावकारीचा व्यवसाय करत असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतचा सविस्तर अहवालही वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात आला. मात्र, तब्बल 5 वर्षे उलटूनही संबंधित सावकारावर ठोस कारवाई झाली नाही. अखेर शेतकर्याने पुन्हा तक्रार केल्यानंतर अमरावतीच्या जिल्हा उपनिबंधकांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत अचल पूरच्या सहाय्यक निबंध कांना तातडीने कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चमक खुर्द येथील शेतकरी राजेंद्र तट्टे यांनी अचलपूरच्या सराफा परिसरातील रमेश तांबे यांच्याविरोधात अवैध पद्धतीने व्याजाने पैसे देत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर 27 डिसेंबर 2024 रोजी सहाय्यक निबंधक पी. एन. गुल्हाने यांच्या पथकाने रमेश तांबे यांच्या घरी छापा टाकला. या वेळी राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांचे स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश, स्वाक्षरी केलेले कोरे मुद्रांकित कागद, संमतीपत्रे तसेच मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रे अशी एकूण 32 संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करून सहाय्यक निबंधकांनी 24 जून 2026 रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला अहवाल पाठवला. त्यात रमेश तांबे यांच्याकडून बेकायदेशीर सावकारीचा व्यवसाय सुरू असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, अहवालानंतरही कारवाई झाली नाही. त्यामुळे राजेंद्र तट्टे यांनी 22 ऑक्टोबर 2026 रोजी पुन्हा लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार यांनी 12 नोव्हेंबर रोजी अचलपूरचे सहाय्यक निबंधक यांना पत्र पाठवून नियमानुसार तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. याप्रकरणातील सर्व कागदपत्रे तयार असून, सहाय्यक निबंधक विजय आंबेडकर हे सध्या रजेवर आहेत. येत्या सोमवारी कार्यालयात रुजू झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. कारवाईच्या विलंबामुळे शेतकर्यांमध्ये नाराजी असून, अवैध सावकारांवर कारवाईसाठी शेतकर्यांना वर्षानुवर्षे पाठपुरावा करावा लागणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
32 कागदपत्रे जप्त तरी कारवाईची प्रतीक्षा
रमेश तांबे यांच्या घरावरील छाप्यात 32 संशयास्पद कागदपत्रे सापडली होती. यात बँकांचे स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश, मुद्रांकित कागद, संमतीपत्रे आणि मालमत्तेच्या व्यवहारांची कागदपत्रे होती. चौकशी अहवालात अवैध सावकारीचा उल्लेख असूनही कारवाई रखडली. आता जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानंतर प्रकरणाला पुन्हा गती मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्ष कारवाई कधी होणार, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.





